धकधक गर्ल माधुरी दीक्षितची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये तशीच आहे. चित्रपट असो किंवा रियालिटी शोज् असोत माधुरी दीक्षितची एक झलकच तिच्या चाहत्यांसाठी पुरेशी असते. आज ही धकधक गर्ल तिचा ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनयाबरोबरच माधुरीला खरी ओळख मिळवून देण्यात तिच्या गाण्यांचाही खूप मोठा वाटा आहे. एक दोन तीन’, ‘धक धक करने लगा’ अशा कित्येक गाण्यांनी माधुरीला स्टार बनवलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या गाण्यांपैकी आणखी एक गाणं ज्याची चित्रपटसृष्टीत प्रचंड चर्चा झाली आणि ते गाणं वादाच्या भोवऱ्यातही अडकलं. ते गाणं म्हणजे १९९३ साली आलेल्या सुभाष घई दिग्दर्शित ‘खलनायक’ चित्रपटातील ‘चोली के पीछे क्या है’. ३२ हून अधिक राजकीय संस्थांनी या गाण्यावर त्या काळी आक्षेप घेऊनही पहिल्या आठवड्यात या चित्रपटाच्या गाण्याच्या तब्बल १ कोटी कॅसेट्स विकल्या गेल्या होत्या.

आणखी वाचा : ‘भोला’ व ‘दृश्यम २’नंतर अजय देवगण करणार ‘या’ चित्रपटाचा रिमेक; ‘हा’ अभिनेता साकारणार महत्त्वाची भूमिका

माधुरी ही एक उत्तम डान्सर आहे, यात काहीच शंका नाही, पण त्या वेळी हे गाणं, त्यातील शब्द, त्यावर बसवलेला माधुरीचा डान्स या सगळ्यांवरच लोकांनी आक्षेप घेतला होता. या गाण्यातील माधुरी दीक्षितचे हावभाव, देहबोली यावर बऱ्याच लोकांनी टीका केली. हे गाणं आणि यामुळे वाढणारा विरोध पाहता दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडियोने या गाण्यावर बंदी घातली होती. या बंदीमुळे माधुरीचं हे गाणं चित्रपटगृहात जाऊन बघणाऱ्या लोकांची संख्या दिवसागणिक वाढू लागली.

या गाण्यातील शब्द हे अश्लील आहेत, असा आरोपही केला गेला होता. एका मुलाखातीदरम्यान याचे गीतकार आनंद बक्षी यांनी यावर भाष्य केलं होतं. आनंद बक्षी म्हणाले, “यात काय अश्लील आहे? हे एक राजस्थानी लोकगीत आहे. तिथल्या लग्नात अशी गाणी वाजतात. तुमचं हृदय हेच ‘चोली’मध्येच असणार, जर तुम्ही शर्ट परिधान केला असेल तर तुमचं मन किंवा हृदय हे त्याच्या आतच असणार. अशी बरीच पंजाबी गाणी आहेत, ज्याचा हिंदीत अर्थ जाणून घ्यायला गेलं तर ती खूप अश्लील वाटतील पण वास्तविक ती तशी नाहीत.”

त्या वेळी या गाण्याला विरोध करणाऱ्यांनादेखील याचं चित्रीकरण आवडलं होतं. प्रेक्षकांनी नंतर हे गाणं अक्षरशः डोक्यावर घेतलं. दिल्ली कोर्टात तर या गाण्याचं प्रसारण थांबवण्यासाठी बऱ्याच याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या. हिंदी चित्रपटातील वादग्रस्त गाण्यांचा इतिहास ‘चोली के पीछे’ या गाण्याशिवाय अपूर्णच राहील.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doordarshan banned madhuri dixit popular choli ke peeche song from khalnayak avn