Madhuri Dixit Mumbai Home Inside Video: आपला अभिनय अन् सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या माधुरी दीक्षितने १९९९ साली डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर ती बॉलीवूड सोडून कायमची अमेरिकेत स्थायिक झाली होती. जवळपास १२ वर्षे माधुरी अमेरिकेत राहिली, तिच्या दोन्ही मुलांचा जन्मही तिथेच झाला. त्यानंतर ती २०११ मध्ये पती व मुलांसह भारतात कायमची परतली. आता माधुरी मुंबईत राहते. तिचं घर खूपच आलिशान आहे.
‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितचं मुंबईतील घर खूपच सुंदर आहे. माधुरी पती डॉ. श्रीराम नेने यांच्याबरोबर ५३ व्या मजल्यावरील एका अपार्टमेंटमध्ये राहते. हे घर आतून कसं दिसतं, त्याचे फोटो समोर आले आहेत. ‘आर्किटेक्चरल डायजेस्ट इंडिया’ने माधुरी दीक्षितच्या घरातील काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
हेही वाचा – करिअरमध्ये तब्बल ५० चित्रपट झाले फ्लॉप, मात्र तरीही कोट्यवधी रुपये मानधन घेतो ‘हा’ अभिनेता
माधुरी दीक्षितच्या घरात एमएफ हुसैन यांच्या पेंटिंग्ज आहेत. म्युझिक इन्स्ट्रुमेंट्ससाठी माधुरीच्या घरात खास जागा आहे. तिच्या घरात कुटुंबाबरोबरचे जुने सुंदर फोटो आहेत. माधुरी व डॉ. नेने यांच्या लग्नातील जुने फोटोदेखील इथे पाहायला मिळतात. त्यांच्या मुलांबरोबरचे फॅमिली फोटोही इथे आहेत. माधुरीच्या घरातील गॅलरीतून समुद्र दिसतो.
माधुरी व डॉ. नेने भारतात का परत आले?
डॉ. श्रीराम नेने यांनी अमेरिकेतून मुंबईत कायमचं स्थायिक होण्याचं का ठरवलं, त्यामागचं कारण सांगितलं होतं. “मी २० वर्षे हार्ट सर्जरी करत होतो आणि प्रत्येक दिवसाला मी तीन ते पाच केसेस सांभाळत होतो. फायदा खूप होता आणि रिवॉर्ड्सही खूप होते. माझे खूप रुग्ण बरे झाले, ते पाहून मलाही छान वाटायचं. पण डॉक्टर होण्यापूर्वी मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सगळं टेक्नॉलॉजीचं काम करत होतो. मला २०११ मध्ये वाटलं की भारताला खूप गरज आहे, त्यामुळे मी तिथून इथे आलो,” असं ते म्हणाले होते.
हेही वाचा – बॉलीवूड अभिनेता ३५ व्या वर्षी करणार अरेंज मॅरेज, मंदिरात बांधणार लग्नगाठ
डॉ. नेनेंच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया कशी होती?
भारतात परत येण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांची प्रतिक्रिया काय होती, याचा खुलासा त्यांनी या मुलाखतीत केला होता. “मी इथे यायचा निर्णय घेतल्यावर माझ्या महाराष्ट्रीय आई-वडिलांना धक्का बसला. कारण मी एका हॉस्पिटलचा हेड होतो. एका वर्षात ५०० केस सांभाळत होतो आणि ते सगळं सोडून मुंबईला यायचं. पण आता त्यांना कळलंय की मी हेल्थकेअर, शिक्षण आणि चित्रपटांसाठी कंपन्या बनवल्या आहेत,” असं ते म्हणाले होते.
© IE Online Media Services (P) Ltd