आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपटाचा सिनेमागृहांमध्ये जलवा पाहायला मिळत आहे. ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ अशा तगडी स्टारकास्ट व बजेट असलेल्या चित्रपटांमध्ये ड्रीम गर्ल टिकेल की नाही, अशी शंका होती. पण या चित्रपटाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. चित्रपटाने सहाव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. त्याची एकूण आकडेवारीही समोर आली आहे.
सनी देओलच्या ‘गदर २’ आणि अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’ या चित्रपटांशी स्पर्धा असूनही आयुष्मान खुरानाच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. सोमवार आणि मंगळवारी चित्रपटाची कमाई स्थिर राहिली त्याने अनुक्रमे ५.४२ कोटी आणि ५.८७ कोटी रुपये कमावले. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सहाव्या दिवसाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे देखील आले आहेत, त्यानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी ‘ड्रीम गर्ल २’ च्या कमाईत मोठी वाढ झाली आहे.
‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘ड्रीम गर्ल २’ ने रिलीजच्या सहाव्या दिवशी ७.७५ कोटी रुपये कमावले आहेत. याबरोबरच या चित्रपटाची ६ दिवसांत एकूण कमाई आता ५९.७५ कोटी रुपये झाली आहे.
ड्रीम गर्ल २ ची सहा दिवसांची कमाई
पहिला दिवस – १०.६९ कोटी रुपये
दुसरा दिवस – १४.२ कोटी रुपये
तिसरा दिवस – १६ कोटी रुपये
चौथा दिवस- ५.४२ कोटी रुपये
पाचवा दिवस – ५.८७ कोटी रुपये
सहावा दिवस ७.७५ कोटी रुपये
एकूण कलेक्शन- ५९.७५ कोटी रुपये
दरम्यान, पूर्ण आठवडा चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. त्यामुळे दुसऱ्या वीकेंडला याच्या कमाईत आणखी वाढ पाहायला मिळेल. आयुष्मान व अनन्या पांडेच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २०१९ मध्ये आलेल्या ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाचा सिक्वेल आहे.