अजय देवगण स्टारर ‘दृश्यम २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून जोरदार कमाई सुरू आहे. पहिल्या चार दिवसांत चित्रपटाने ७५ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपट पहिल्याच आठवड्यात १०० कोटी रुपयांचा टप्पा गाठेल, अशी शक्यता आहे. दरम्यान, चित्रपट प्रदर्शक आणि माजी निर्माते मनोज देसाई यांनी चित्रपटाच्या कमाईबद्दल भाष्य केलंय. ‘दृश्यम २’ हा त्यांच्या मुंबईतील प्रतिष्ठित मराठा मंदिर आणि गेटी गॅलेक्सी येथे हाऊसफुल्ल शो देणारा मागच्या अनेक वर्षांमधील पहिला चित्रपट आहे, असं देसाईंनी म्हटलं आहे.
हेही वाचा – Kartik Aaryan Birthday: ‘हे’ आहे कार्तिक आर्यनचं खरं नाव, तुम्हाला माहितीये का?
फिल्मीफेअर यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत देसाई म्हणाले, “बॉलिवूड चित्रपट खूप वाईट कामगिरी करत असल्यामुळे आम्ही चिंतेत होतो. पण इतक्या वर्षांनंतर एका चित्रपटाने हाऊसफुल शो दिले आहेत. गेटी गॅलेक्सी थिएटरमध्ये १००० लोक एकाच वेळी चित्रपट पाहू शकतात, तर मराठा मंदिरात १२०० लोक चित्रपट पाहू शकतील इतकी क्षमता आहे. रविवारी संपूर्ण शोच्या तिकिटांची विक्री झाली. सोमवारी देखील चित्रपटाचे शो ५०% पेक्षा जास्त क्षमतेने चालू आहेत,” असं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा – “प्रेक्षक खूप हुशार झालेत आणि…” बॉलिवूड चित्रपट अयशस्वी होण्याबद्दल अजय देवगणचं मोठं वक्तव्य
बॉलिवूडने ओरिजनल कंटेंट तयार करायचं ठरवलं तर ते दृश्यम २ पेक्षाही चांगले हिट चित्रपट देऊ शकतात. पण बॉलिवूड तसं करत नाही. बॉलिवूड निर्माते त्यांचा भार वितरकांवर टाकतात आणि वितरक हा भार प्रदर्शकांवर टाकतात. यामुळे ते स्वतः सुरक्षित असतील, परंतु आम्हाला शेवटी भंगार उचलावं लागेल, असंही देसाई म्हणाले.
हेही वाचा – ‘कौन है वो…’ अजय देवगणच्या बहुचर्चित ‘भोला’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
दरम्यान, बॉलिवूडसाठी २०२२ हे वर्ष खूप कठीण होतं. यंदा फक्त चार चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. ‘भूल भुलैया २’ आणि ‘द काश्मीर फाईल्स’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’ हे चार चित्रपट यंदा प्रेक्षकांची मनं जिंकू शकले. याशिवाय बाकी अनेक बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.