भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० विश्वचषक २०२४ (T-20 Worldcup)चा सामना काल शनिवारी (२९ जून) बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर रंगला. १७ वर्षांच्या कालावधीनंतर आयसीसी टी-२० विश्वचषक भारतीय संघाने आपल्या नावावर केला. सामान्य माणसांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकांवर या मॅचचे उत्सुकतेसह दडपण होतं. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप असेल त्या साधनांवर क्रिकेटप्रेमी कालची मॅच रंगताना पाहत होते. पण, बॉलीवूडचे सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन यांनी कालची मॅच पाहण्याचे स्वत:हून टाळले.

अमिताभ बच्चन यांनी याबद्दल त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं, त्यांनी कालचा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना पाहिला नाही आणि यामागचं कारणही बिग बींनी सांगितलं. ते जेव्हाही मॅच पाहतात तेव्हा भारतीय संघ सामना हरतो, असं त्यांचं म्हणणं आहे. भारतीय संघाच्या या घवघवीत यशानंतर अमिताभ बच्चन यांनी या जगज्जेत्या भारतीय संघाचं कौतुक मात्र केलं.

हेही वाचा… T-20 Worldcup: “दिल जीत लिया…”, सलमान खान, रणवीर सिंग ते विकी कौशल; ‘या’ बॉलीवूड कलाकारांनी केलं भारतीय संघाचं कौतुक, भावुक होत म्हणाले…

अमिताभ बच्चन यांनी भारतीय संघानं मिळविलेल्या या जेतेपदाबद्दलचा आनंद व्यक्त केला; मात्र त्यांनी हा सामना पाहिला नसल्याच नमूद केलं. त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं, “मी मॅच सुरू असतानाचा टीव्हीवरचा उत्साह, त्यादरम्यानच्या भावना आणि भीती अनुभवली नाही. कारण- मी जेव्हाही टीव्हीवर मॅच पाहतो, तेव्हा आपण हरतो. त्यामुळे आता फक्त संघाचे आनंदाश्रू आणि माझ्या आनंदाश्रूंची मी सांगड घालत आहे.”

तथापि, भारतीय संघ आयसीसी विश्वचषक जिंकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर ट्वीट करून भारतीय संघाचं भरभरून कौतुक केलं. त्यांनी लिहिलं , “टीम इंडियाच्या वाहलेल्या अश्रूंशी एकरूप होऊन माझे अश्रू वाहत आहेत…” त्यांनी पुढे असंही लिहिलं, “वर्ल्ड चॅम्पियन्स इंडिया”, “भारतमाता की जय, जय हिन्द जय हिन्द जय हिन्द “

हेही वाचा… सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालचं आंतरधर्मीय लग्न आम्हाला मान्य नाही! अभिनेत्रीचं व्यक्तिस्वातंत्र्य ट्रोलर्सच्या हातात?

अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यानंदेखील त्याच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून या विजयाचा आनंद साजरा करीत ट्वीट शेअर केलं.

शनिवारी (२९ जून) बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन येथील केन्सिंग्टन ओव्हलवर हा अंतिम सामना खेळविला गेला. त्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी अविस्मरणीय विजय मिळविला आणि दुसऱ्यांदा हा विश्वचषक आपल्या नावावर केला. भारताने यापूर्वीचा टी-२० विश्वचषक महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये मिळविला होता.