बॉक्स ऑफिसवर सध्या ‘डंकी’ विरुद्ध ‘सालार’ ही स्पर्धा बघायला मिळत असली तरी या दोघांच्या बरोबरीनेच रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’सुद्धा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने ८०० कोटींचा टप्पा पार केला असून १००० कोटींपर्यंत पोहोचण्यात मात्र चित्रपट अपयशी ठरला आहे. ‘डंकी’ आणि ‘सालार’मुळे याच्या कमाईवर परिणाम झाला असल्याचं दिसत आहे. ‘अॅनिमल’ जबरदस्त कमाई जरी करत असला तरी यावर जोरदार टीकादेखील होताना दिसत आहे.
एकूणच कथेतील हिंसा, स्त्रियांचं चित्रण आणि बोल्ड सीन्स यामुळे बरीच लोक या चित्रपटावर टीका करताना दिसत आहेत. बऱ्याच सेलिब्रिटीजनीदेखील यावर भाष्य केलं आहे. नुकतंच ‘डंकी’ फेम अभिनेता विक्रम कोचर यानेदेखील ‘अॅनिमल’वर आणि सध्याच्या लोकांच्या मानसिकतेवर भाष्य केलं आहे. ‘बॉलिवूड नाऊ’शी संवाद साधताना ‘अॅनिमल’सारखे चित्रपट का यशस्वी ठरतायत याचा अंदाज घेत उत्तर दिलं आहे.
विक्रम म्हणाला, “सध्या बरेच अॅक्शन थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतायत. परंतु यामागे एक राजकीय पार्श्वभूमीदेखील आहे. सध्या जगभरातच पाहा कित्येक ठिकाणी युद्धाची लक्षणं दिसत आहेत. लोकांमध्ये सध्या प्रचंड संताप, चीड आहे, प्रत्येकाच्या मनात सूडाची भावना पाहायला मिळत आहे, पण या सगळ्या गोष्टींचे दूरगामी परिणाम त्यांना ठाऊक नाहीयेत.”
आणखी वाचा : २०२३ वर्ष किंग खानचं; तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांतून एका वर्षात ‘इतके’ कोटी कमावणारा पहिला अभिनेता
विक्रम पुढे म्हणाला, “माझा एक मित्र मला मध्यंतरी एक गोष्ट सांगत होता की बरीच मंडळी ही वर्चस्वासाठी झगडत आहेत, पण त्या ताकदीचा नेमका कसा वापर करायचा तेच बऱ्याच लोकांना ठाऊक नाहीये. जेव्हा याच सगळ्या गोष्टी ही मंडळी मोठ्या पडद्यावर पाहतात तेव्हा त्यांची मनातील सुप्त इच्छा पूर्ण होते. परंतु चित्रपटांची प्रेक्षकांप्रती काही जबाबदारीदेखील आहे. सत्यजित रे यांच्या चित्रपटांचे उदाहरण घ्या. बहुतांश प्रेक्षक वर्ग ज्यांना मास म्हंटलं जातं त्यांना टे चित्रपट आवडणार नाहीत. जर त्या लोकांना एखाद्या व्यक्तीचा गळा चिरताना पाहायचं असेल आणि तुम्ही ते दाखवत असाल तर मग तुम्ही अशा गोष्टींचं उदात्तीकरण करताय जे कधीच करायला नको.”
सध्या लोकांच्या मनातील मूळ भावनाच रागाची आहे आणि म्हणूनच कदाचित तसेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहेत असं मत विक्रम कोचरने मांडलं आहे. ‘डंकी’मध्ये विक्रम कोचरसह तापसी पन्नू, अनिल ग्रोव्हर, बोमन इराणी, विकी कौशल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. लवकरच ‘डंकी’ बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा पार करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.