शाहरुख खानचा ‘डंकी’ चित्रपट २०२३ च्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये किंग खानसह अनेक लोकप्रिय कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात वरुण कुलकर्णी हा मराठी अभिनेता सुद्धा झळकला होता. सध्या वरुणची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्याच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे देखील नाही आहेत.
वरुण कुलकर्णीचा मित्र रोशन शेट्टीने अभिनेत्याची हेल्थ अपडेट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वरुन किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे आणि आठवड्यातून किमान दोनदा तरी त्याचं डायलिसिस केलं जातं, असं रोशन शेट्टीने या पोस्टमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे या कठीण काळात वरुणला मदत करण्याचं आवाहन रोशन शेट्टीने सोशल मीडियावर केलं आहे.
“माझा प्रिय मित्र आणि रंगभूमीवरील सहकलाकार वरुण कुलकर्णी सध्या किडनीच्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. त्याच्या उपचारासाठी आम्ही आधी देखील लोकांना मदतीसाठी आवाहन केलं होतं. मात्र, दिवसेंदिवस त्याच्या उपचारांचा खर्च वाढतच जात आहे. त्याला आठवड्यातून २ ते ३ वेळा डायलिसिसची आवश्यकता भासते, त्याचबरोबर नियमित हेल्थ चेकअप आणि आपत्कालीन परिस्थितीत त्याला रुग्णालयात सुद्धा यावं लागतं.
दोन दिवसांपूर्वीच, वरुणला आपत्कालीन परिस्थितीत डायलिसिससाठी रुग्णालयात नेण्यात आलं.” असं रोशनने त्याच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.
रोशन पुढे म्हणाला, “वरुण हा केवळ एक उत्तम कलाकारच नाही तर एक दयाळू आणि निस्वार्थी माणूस देखील आहे. तो लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचं निधन झालं. तेव्हापासून त्याने स्वत:च्या मेहनतीवर सगळं उभं केलं. सर्व अडचणींवर मात करत काम करत राहिला. कलाकाराच्या आयुष्यात अनेकदा आर्थिक आव्हाने येतात आणि या कठीण क्षणी त्याला आपल्या पाठिंब्याची पूर्वीपेक्षा जास्त गरज असते. या कठीण काळात वरुणला मदत करण्यासाठी आम्ही, त्याचे मित्र आणि हितचिंतक एकत्र येत आहोत. जर तुम्ही वरुण किंवा रियाला वैयक्तिकरित्या ओळखत असाल तर तुम्ही तुमचे योगदान थेट त्यांना पाठवू शकता. जे त्यांना ओळखत नाहीत त्यांना पैसे पाठवणं सोयीचं होण्यासाठी केटो लिंक तयार करण्यात आली आहे.”
“तुमचा पाठिंबा – कितीही असो – पण तुमच्या लहानशा मदतीने मोठा फरक पडू शकतो. ही पोस्ट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. वरुणला पुन्हा एकदा रंगभूमीवर आणण्यासाठी आपण मिळून प्रयत्न करु.” अशी पोस्ट शेअर करत रोशनने वरुणच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी आवाहन केलं आहे.
दरम्यान, वरुण कुलकर्णीने ‘डंकी’ मध्ये एक लहानशी भूमिका केली होती. डंकी व्यतिरिक्त वरुणने ‘स्कॅम १९९२’ आणि ‘द फॅमिली मॅन’ यांसारख्या सीरिजमध्येही भूमिका साकारल्या आहेत.