बॉलीवूडचा किंग शाहरुख खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. लवकरच शाहरुखचा डंकी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या चित्रपटातील पहिले गाणे ‘लुट पुट गया’ प्रदर्शित झाले. या गाण्याला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. याअगोदर शाहरुखचे जवान आणि पठाण चित्रपट सुपरहिट ठरले होते. त्यामुळे आता चाहते डंकीची आतुरतेने वाट बघत आहे. परंतु प्रदर्शनाअगोदरच डंकीने एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे.
शाहरुखचा ‘डंकी’ चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. डंकीमध्ये शाहरुख खानबरोबर तापसी पन्नू आणि विकी कौशलची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचे बजेट ८५ कोटी रुपये आहे. शाहरुखचा ‘जब हॅरी मेट सेजल’ ९० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. तर ‘रईस’ ९०-९५ कोटींमध्ये बनला होता. ‘झिरो’ २०० कोटी, ‘पठाण’ २४० कोटी आणि ‘जवान’ ३०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. मात्र, डंकी केवळ ८५ कोटीच्या बजेट बनवण्यात आला असल्याने हा चित्रपट शाहरुख खानचा गेल्या सहा वर्षांतील सर्वात कमी बजेटचा चित्रपट ठरला आहे.
हेही वाचा- सलमान खानच्या भाचीचा पदार्पणाचा चित्रपट प्रदर्शित, ‘फर्रे’ ची पहिल्या दिवशी निराशाजनक कामगिरी
एका मीडिया रिपोर्टमधून मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी चित्रपटाचे शुटिंग ७५ दिवसांत पूर्ण केले. यामध्ये शाहरुख खानने ६० दिवसांचे शूटिंग केले आहे. पठाण आणि जवान नंतर डिंकी देखील ब्लॉकबस्टर ठरेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण पठाणने जगभरात १००० कोटींहून अधिक कमाई केली होती, ‘जवान’ हा ११५० कोटी रुपयांची कमाई करत ५वा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट आणि आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे.