Chhava Movie screening: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर बेतलेला छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सिनेरसिकांचा त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनापासून चित्रपटाबद्दल लोक भरभरून बोलत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्येही चित्रपटाला हाऊसफुल प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान गुजरातमधील भरूच येथील एका चित्रपटगृहात ‘छावा’ चित्रपट सुरू असताना एक विचित्र घटना घडली आहे. रविवारी रात्री आरके सिनेमा येथे रात्री ११.४५ चा शो सुरू असताना एका प्रेक्षकाने चित्रपटगृहाचा पडदा फाडला. बराच गोंधळ झाल्यानंतर या प्रेक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान इतर प्रेक्षकांनी या घटनेचा व्हिडीओ चित्रीत केला असून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. चित्रपटात औरंगजेब छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ करत असतानाचा सीन सुरू असताना सदर प्रेक्षक चवताळला आणि त्याने चित्रपटगृहाच्या पडद्याचे नुकसान केले.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी जयेश वसावा हा चित्रपट पाहत असताना शुद्धीत नव्हता. चित्रपटात शेवटचा सीन सुरू असताना तो धावत पडद्याजवळ गेला आणि तेथे असलेल्या अग्निशामक यंत्राने त्याने पडद्याचे नुकसान केले. मल्टिप्लेक्सचे कर्मचारी धावत येईपर्यंत तो पडद्याचे नुकसान करत राहिला.

भरूच अ विभागाचे पोलीस अधिकारी म्हणाले, चित्रपटाच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने कैद केल्याचे दाखवले आहे. या प्रसंगानंतर औरंगजेब महाराजांचा छळ करत असतो. यावेळी सदर आरोपी चवताळला आणि त्याने पडद्यावर दिसणाऱ्या औरंगजेबावर हल्ला केला. आरके सिनेमाचे महाव्यवस्थापक आरव्ही सूद म्हणाले की, मला कर्मचाऱ्यांनी फोन करून सांगितले की, एका प्रेक्षकाने चित्रपटगृहाच्या पडद्याचे नुकसान केले. पडद्याचे आणखी नुकसान करण्यापासून त्याला रोखा असे सांगून मी पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

सूद पुढे म्हणाले की, रविवारी रात्री जे इतर प्रेक्षक सिनेमाला आले होते. त्यांना दुसऱ्या स्क्रीनवर चित्रपट पाहण्याची किंवा पैसे परत घेण्याची संधी दिली गेली. १० ते १५ लोकांनी पैसे परत घेतले तर इतर प्रेक्षकांनी दुसऱ्या स्क्रिनवर चित्रपट पाहण्याची तयारी दर्शविली.

पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. खासगी मालमत्तेचे नुकसान करणे, कर्मचाऱ्यांना शिविगाळ केल्याप्रकरणी त्याच्यावरगुन्हा दाखल झाला आहे.

Story img Loader