भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्री रेखा(Rekha) यांचे योगदान मोठे आहे. ‘कलयुग’, उमराव जान’, ‘धरम करम’, ‘मिस्टर नटवरलाल’,’करमयोगी’, ‘दो शिकारी’ या आणि अशा अनेक चित्रपटांत रेखा यांनी काम करत त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांच्याबरोबर काम केलेले सहकलाकार, निर्माते, दिग्दर्शक वेळोवेळी त्यांच्या कामाचे आजही कौतुक करताना दिसतात. दिग्गज दिग्दर्शक श्याम बेनेगल ज्यांचे नुकतेच काही दिवसांपूर्वी निधन झाले, त्यांनी O2 स्टुडिओला दिलेल्या एका मुलाखतीत रेखा यांचे कौतुक केले होते.
९ च्या शिफ्टला १२.३० ला पोहोचलेल्या रेखा…
श्याम बेनेगल यांनी या मुलाखतीत म्हटले होते, “मी माझ्या चित्रपटात दिग्गज नसलेल्या कलाकारांना संधी देत असे.त्यामुळे जेव्हा १९८१ च्या कलयुग चित्रपटात जेव्हा मी रेखाला कास्ट केले, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले होते. रेखा इतरांपेक्षा वेगळी ठरण्याचे आणखी एक कारण म्हणजे पाहिल्यानंतर तिच्या लक्षात राहायचे. तिची फोटोग्राफिक मेमोरी होती. तुम्ही जर तिला एखादा संवाद पाठ करण्यासाठी दिला. तर ती एकदा वाचत असे आणि ते संवाद तिच्या लक्षात राहत असत. कोणी तिला वाचून जरी दाखवले तरी तिला तो संवाद पाठ होत असे.”
‘कलयुग’ चित्रपटातील एक किस्सा सांगताना श्याम बेनेगल यांनी म्हटले होते, “कलयुगमध्ये रेखा महत्वाच्या भूमिकेत होती. त्यामुळे मी तिच्यासाठी तीन दिवसांसाठी डबिंग स्टुडिओ बुक केला होता. ९ वाजता रेखाने त्या स्टुडिओमध्ये येणे अपेक्षित होते मात्र १२.३० वाजेपर्यंत ती पोहोचली नाही. त्यामुळे मला राग आला होता. ती १२.३० ला आली. जेवणासाठी १ वाजता सुट्टी होत असे. मात्र त्यावेळी आम्ही जेवणासाठी ब्रेक घेतला नाही.डबिंग सेशन फक्त २० मिनिटे वाढवले आणि रेखाने तिच्या सर्व ओळी वाचून संपवल्या. त्याच दिवशी तिचे संपूर्ण संवाद वाचून झाले होते. मी पुढच्या दोन दिवसांसाठी जे स्टुडिओ बुक केलं होतं ते रद्द केलं. ती अत्यंत प्रतिभाशाली अभिनेत्री होती”, तिच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे माझ्या रागाची जागा आश्चर्याने घेतली होती, असे श्याम बेनेगल यांनी सांगितले होते.
रेखा यांच्यासाठी १९८१ हे वर्ष महत्वाचे ठरले. ‘कलयुग’ चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिकेतून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर त्याच वर्षी प्रदर्शित झालेला ‘उमराव जान’ या चित्रपटातील रेखा यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
दरम्यान, समांतर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे श्याम बेनेगल यांचे २४ डिसेंबर २०२४ ला निधन झाले.