बॉलीवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांनी नुकतीच वयाची पंचाहत्तरी साजरी केली. वाढणारं वय हा फक्त एक आकडा आहे हे वाक्य हेमाजींना अगदी जसंच्या तसं लागू होतं. दिलखुलास व्यक्तिमत्त्व, ओघवती वाणी, स्वभावातील नम्रपणा आणि चेहऱ्यावरच्या निखळ हास्याने त्यांनी लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ‘ड्रीम गर्ल’ने वयाची पंचाहत्तरी गाठली तरी अनेकांना आजही त्यांचं पूर्ण नाव माहिती नाही. बस नाम ही काफी है…या डायलॉगप्रमाणे हेमा मालिनींच्या नावातंच रुबाबदारपणा जाणवतो. विजयदशमीच्या मुहूर्तावर घरी लक्ष्मीचं आगमन झाल्याने त्यांचं नाव फार विचारपूर्वक ठेवण्यात आलं होतं. हेमाजींचं नाव कोणी आणि कसं ठेवलं याबद्दलचं अचूक वर्णन लेखिका भावना सोमय्या यांच्या ‘हेमा मालिनी’ या पुस्तकात करण्यात आलं आहे. आज दसऱ्याच्या निमित्ताने जाणून घेऊया अभिनेत्रीच्या रुबाबदार नावामागचा खास किस्सा…
हेही वाचा : ‘हा’ मराठी अभिनेता होता तेजस्विनी पंडितचा पहिला क्रश; आठवण सांगत म्हणाली, “माझ्या…”
विजयादशमीच्या मुहूर्तावर १६ ऑक्टोबर १९४८ रोजी बॉलीवूडच्या ड्रीम गर्लचा जन्म तामिळनाडू येथे झाला. हेमाजींचं पूर्ण नाव हेमा मालिनी चक्रवर्ती असं आहे. वी.एस.रामानुजम आणि जया चक्रवर्ती यांच्या लावण्यसंपन्न मुलीच्या नावाचा अर्थ खूपच खास आहे. हेमाजींचे वडील ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’मध्ये नोकरीला होते. त्यावेळी जया चक्रवर्ती सात महिन्यांच्या गरोदर होत्या. परंपरेप्रमाणे सातव्या महिन्यात त्या आपल्या दोन्ही मुलांसह माहेरी जायला निघाल्या. हेमाजींच्या आई जया, दोन भाऊ पहिला कानन (चार वर्ष) आणि दुसरा जगन्नाथ (दोन वर्ष) यांना स्टेशनच्या गर्दीतून वाट मोकळी करून देत चक्रवर्तींनी गाडीत बसवलं. खिडकीजवळ बसलेल्या हेमाजींच्या आईला तामिळनाडूतील अमनगुडी अर्थात माहेरच्या अंगणाची ओढ लागली होती.
हेमाजींचे आजोबा (आई जया यांचे बाबा ) पार्थसारथी अय्यंगार अत्यंत धार्मिक होते. त्यामुळे त्यांनी मुलांवरही तसेच संस्कार केले होते. गायत्री मंत्राचं पठण, विविध मंत्रोच्चार करण्याबरोबरच रोज सायंकाळी मंदिरातील आरतीला जाण्याची सवय त्यांनी आपल्या मुलांना लावली होती. हेमाजींच्या आई जया यांनादेखील मंत्रपठणातला उद्घोष, त्याचा ध्वनी अतिशय आवडायचा. विशेषत: लक्ष्मीदेवतेच्या निरनिराळ्या अवतारांचं वर्णन करणारं लक्ष्मीसूत्र त्यांच्या खास आवडीचं होतं. गरोदरपणात त्यांनी भिंतीवर देवीदेवतांची सुंदर चित्र साकारली होती.
त्या काळात आजच्याप्रमाणे महिला चित्रकारांची संख्या मोठी नव्हती. त्यामुळे जया यांनी रेखाटलेल्या चित्रांचं सर्वांनाच कौतुक होतं. लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा या देवींची चित्र रेखाटताना जया यांना लक्ष्मी मातेचं एक चित्र विशेष आवडलं होतं. या चित्रात लक्ष्मी माता गळ्यात हार घालून कमळावर अधिष्ठित झालेली होती. विलक्षण योगायोग म्हणजे नवरात्र उत्सव संपताच दसऱ्याच्या मध्यरात्री जया यांच्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी नव्या पाहुणीचं आगमन झालं. तामिळनाडूत त्रिचनापल्लीमधील एका लहानशा अमनगुडी गावात हेमाजींचा जन्म झाला. दोन भावांमागे जया यांना हेमाजींच्या रुपात तिसरी मुलगी झाली.
जया चक्रवर्ती यांनी लाडक्या लेकीचं नाव हेमा मालिनी ठेवलं. या नावाचा अर्थ दिव्य सौंदर्य!
आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम् ।
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह
जया चक्रवर्ती यांना श्रीसूक्त (लक्ष्मीसूक्त)मध्ये हेमामालिनी हे अनोखं नाव सापडलं. श्रीसूक्त हे लक्ष्मीची स्तुती व आराधना करण्यासाठीचं वैदिक स्तोत्र आहे. याविषयी हेमा मालिनी सांगतात, “माझ्या अम्मानं मला एकदा सांगितलं. मी पोटात असताना ती सतत लक्ष्मीची चित्र काढायची, कारण देवी तिला स्वप्नात वारंवार दर्शन देत होती.”
हेमा मालिनी जशा मोठ्या होऊ लागल्या तशी अम्माच्या मनात आपल्याबद्दल काही खास आशाआकांक्षा, स्वप्न आहेत याची जाणीव त्यांना होऊ लागली. त्यांचे दोन भाऊ कानन आणि जगन्नाथ यांच्यावर हेमाजींच्या वडिलांची बारीक नजर असायची, तर हेमाला त्यांना पूर्णपणे जया यांच्या हाती सोपवलं होतं. हेमाजींच्या प्रत्येक हालचालीला त्यांनी वळण लावलं. कसं चालावं, कसं बसावं याचं श्रेय कायम माझ्या अम्माला जाईल असं हेमाजी अभिमानाने सांगतात.