ऑनलाईन सट्टेबाजी अॅप प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय नावं समोर येऊ लागली आहे. मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग अॅप प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलं आहे. त्याला ६ ऑक्टोबर रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. या प्रकरणात एक साक्षीदार म्हणून त्याचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ आता आणखी काही बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांना ईडीने समन्स बजावलं आहे.
रणबीरपाठोपाठ लोकप्रिय विनोदी अभिनेता आणि टीव्ही कलाकार कपिल शर्मा आणि बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी, मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान या तिघांना ईडीने समन्स बजावलं आहे. ईडी या तिन्ही कलाकारांची चौकशी करणार आहे. ही चौकशी कधी होणार आहे याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार या तीन कलाकारांनाही ६ ऑक्टोबर रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं.
कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हीना खान हे तिघे दुबईत आयोजित एका आलिशान पार्टीत एक कार्यक्रम सादर करण्यासाठी गेले होते. त्यावेळी काही कलाकारांनी या अॅपची जाहिरात केली होती. त्यामुळे हे तिन्ही कलाकार आता ईडीच्या रडारवर आहेत. हे जुगाराचं ऑनलाईन अॅप लोकांना गेमिंगसाठी प्रोत्साहित करतं.
हे ही वाचा >> “माफियाची भूमिका दिली, पण चित्रीकरणावेळी मला…”, पंकज त्रिपाठींनी सांगितला पदार्पणाचा किस्सा
दरम्यान, याप्रकरणी अभिनेता रणबीर कपूरबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रणबीरने चौकशीला हजर राहण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. परंतु, रणबीरला वेळ वाढवून द्यायचा की नाही याबाबत ईडीने अद्याप निर्णय घेतलेला नाही. या प्रकरणात ईडीच्या रडारवर इतरही अनेक कलाकार आहेत. यामध्ये अतीफ असलम, राहत फतेह अली खान, अली असगर, विशाल ददलानी, टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर, नेहा कक्कड, भारती सिंह, एलि एव्हराम, सनी लियोनी, भाग्यश्री, पुलकित सम्राट, कीर्ती खरंबदा, नुसरत भरुचा आणि कृष्णा अभिषेक यांचा समावेश आहे.