मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात आगामी ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्याविरोधातील आंदोलन करण्यात आलं. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटावर ‘अश्लील दृश्यं’ आणि भगव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत या बंदीसंदर्भातील विधान केल्यानंतर हे आंदोलन करण्यात आलं.

वीर शिवाजी नावाच्या गटाने केलेल्या आंदोलनामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता शाहरुख खानच्या पुतळे जाळण्यात आले. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली. हा चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केला आहे.

विश्लेषण : ‘बेशरम रंग’ ते हिंदू महासभेचा आक्षेप; ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात; नेमकं प्रकरण काय?

‘पठाण’ चित्रपटातील पहिलं गाणं नुकतेच प्रदर्शित झाले. हे गाणं चर्चेचा विषय ठरत असून मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या कपड्यांच्या रंगावरुन आक्षेप घेतला. ‘या चूका सुधाराव्यात’ अशी मागणीही राज्याच्या गृहमंत्र्यांनी शाहरुखचं नाव घेऊन केली. गाण्यातील काही दृष्य योग्य नाहीत असं राज्याच्या गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्य सरकार हा चित्रपट राज्यात प्रदर्शित करायचा की नाही याबद्दल विचार करेल असंही मिश्रा यांनी म्हटलं.

हेही वाचा – ‘पठाण’च नाही, तर दीपिका पदुकोणचे ‘हे’ चित्रपट रिलीजच्या आधीच अडकले होते वादाच्या भोवऱ्यात

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी चित्रपटात दीपिकाच्या बिकिनीच्या रंगासह गाण्याच्या बोलांवरही आक्षेप नोंदवला आहे. “‘पठाण’ हा चित्रपट दोषपूर्ण असून विषारी मानसिकतेवर आधारित आहे. ‘बेशरम रंग’ गाण्याचे बोल आणि गाण्यात घातलेले भगवे आणि हिरवे कपडे यामध्ये निर्मात्यांनी बदल करणे आवश्यक आहे. नाही तर चित्रपटाचे प्रदर्शन मध्य प्रदेशात होऊ द्यायचे की नाही याचा निर्णय आम्ही घेऊ,” असं गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटलंय.

गृहमंत्री मिश्रा यांनी दीपिकावर चित्रित करण्यात आलेले काही सीन्स बदलण्याची मागणी केली आहे. असे न केल्यास आपल्या राज्यात चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.