Eijaz Khan and Pavitra Punia : ‘बिग बॉस’च्या १४ व्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री पवित्रा पुनिया आणि अभिनेता एजाज खान काही काळापुर्वी एकमेकांपासून वेगळे झाले. दोघेजण शोमध्ये एकमेकांना भेटले. शोमध्ये असताना दोघांमध्ये खूप भांडणं झाली, पण नंतर हळूहळू हे भांडण प्रेमात बदललं. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर दोघं एकमेकांना डेट करू लागले. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.
पवित्रा पुनिया आणि एजाज खान यांनी काही काळ एकत्र वेळ घालवल्यानंतर एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षे एकत्र राहिल्यानंतर, हे जोडपे अचानक वेगळे झाले. २०२३ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले होते. त्यानंतर हे दोघे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. एका लघुपटासाठी दोघे एकत्र आले असून यामुळे त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे आणि दोघांच्या एकत्र येण्याबद्दल एजाजने प्रतिक्रियाही दिली आहे.
एजाज आणि पवित्रा दलजीत कौर निर्मित ‘नफ्स’ नावाच्या लघुपटावर काम करण्यासाठी पुन्हा एकत्र आले आहेत. दोघांनी यात काम केले असून ‘हिंदुस्तान टाईम्स’शी बोलताना एजाजने पवित्राबरोबरच्या नात्याबद्दल असं म्हटलं की, “आम्ही या लघुपटाचे चित्रीकरण तीन वर्षांपूर्वी केले होते. मला यापेक्षा जास्त भाष्य करायचे नाही. याबद्दल आणखी काय ते दलजीतच सांगू शकते.”
यानंतर दलजीतलाने एजाज आणि पवित्राच्या लघुपटाविषयी असं म्हटलं की, “एजाज आणि पवित्रा दोघेही कलाकार आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर मी त्यांच्याबरोबर चित्रीकरण केले होते. दोघांनी खुप छान काम केलं आहे. दुर्दैवाने हा लघुपट प्रदर्शित होण्यास खूप वेळ लागला.” शिवाय दलजीतने दोघांच्या नात्याबद्दलदेखील भाष्य केलं. याबद्दल तिने ही दोघांची निवड असल्याचं म्हटलं.
याविषयी दलजीत असंही म्हणाली की, “मी एजाज आणि पवित्रा यांना लघुपटाबद्दल आधीच सगळं संगितलं होतं आणि त्यांनीही ते मान्य केले होते. चित्रीकरणादरम्यान त्यांची केमिस्ट्री चांगली होती. या लघुपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी एकत्र येण्याची गरज नाही. त्यामुळे त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. दोघांनी नेहमीच माझ्यावर विश्वास दाखवला आहे.” दरम्यान, एजाज-पवित्रा यांच्या पुन्हा एकत्र येण्याने चाहत्यांना आनंद झाला.