टीव्ही विश्वातील एकता कपूर हे मोठं नाव आहे. गेली अनेक वर्षं एकता कपूर मालिका विश्वात कार्यरत आहे. मालिकांमधील यशानंतर तिने चित्रपटांची निर्मिती केली. सध्या एकता तिच्या ‘थॅंक यू फॉर कमिंग’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. या चित्रपटाचा विषय ट्रोलिंगसाठी कारणीभूत ठरला आहे.
याबद्दल नुकतंच एकताने ट्विटरवर भाष्य केलं आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर एकता पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. आल्याआल्या तिने ट्रॉलर्सची चांगलीच शाळा घ्यायलाही सुरुवात केली आहे. आपल्या चित्रपटाबद्दल एकता लिहिते, “हा एक प्रचंड वेडेपणा ठासून भरलेला चित्रपट आहे जो मी माझी मैत्रीण रियाबरोबर केला आहे. यामुळे पितृसत्ताक वृत्ती संपुष्टात नक्कीच येणार नाही, पण हा चित्रपट पाहून त्या विचारांच्या लोकांच्या नाकाला मिरच्या नक्कीच झोंबतील.”
आणखी वाचा : ‘गणपत’च्या ट्रेलर लॉंचसाठी क्रीती सेनॉनचा खास हॉट डेनिम लुक; फोटो पाहून चाहते घायाळ
“या चित्रपटावर काही लोक भरभरून प्रेम करत आहेत तर काही लोक याची जोरदार टीका करत आहेत.” असंही एकताने म्हंटलं आहे. एका ट्विटर यूझरने यावरून एकता कपूर आणि करण जोहरवर टीका केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्या यूझरने पिढीला बिघडवण्याचं काम एकता आणि करण जोहरने मिळून केल्याचा आरोप केला आहे.
इतकंच नव्हे तर त्याने एकताला एडल्ट चित्रपट काढायचं बंद करायला सांगितलं आहे. याला उत्तर देताना एकताने आपल्या ट्विटरमध्ये लिहिलं, “नाही, मी एडल्ट आहे त्यामुळे मी एडल्ट चित्रपटच बनवणार.” एकताच्या ट्वीटची चांगलीच चर्चा होत आहे. एकताच्या थॅंक यू फॉर कमिंग’मध्ये भूमी पेडणेकर, शहनाज गिल, शिबानी बेदी, कुशा कपिला यांच्या प्रमुख भूमिका आहेत.