Rajkumar Rao : भारतीय निवडणूक आयोगाने अभिनेता राजकुमार रावची नियुक्ती नॅशनल आयकॉन म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. २६ ऑक्टोबर २०२३ या दिवशी त्याची नियुक्ती नॅशनल आयकॉन म्हणून करण्यात येणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने राजकुमार राववर खास जबाबदारी टाकण्याचं ठरवलं आहे. २६ ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
भारतातल्या पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने या महिन्याच्या सुरुवातीलाच ही घोषणा केली. आता विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन करताना अभिनेता राजकुमार राव दिसणार आहे. राजकुमार राव हा त्याच्या प्रत्येक भूमिकेला न्याय देत असतो. त्याचप्रमाणे तो ही नवी जबाबादारीही चोखपणे पार पाडेल असा विश्वास निवडणूक आयोगाला वाटतो आहे.
विधानसभेची निवडणूक छत्तीगडमध्ये ७ ते १७ नोव्हेंबरच्या दरम्यान दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. मध्यप्रदेश आणि तेलंगण या ठिकाणी १७ आणि ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला मतदान होणार होतं पण ते आता २५ नोव्हेंबरला होणार आहे आणि ३ डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, छत्तीसगड,मध्य प्रदेश, तेलंगणा आणि राजस्थान या राज्यांमधील निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या विधानसभा निवडणुका महत्त्वाचं काम करणार आहेत. ANI ने राजकुमार राव विषयीचं वृत्त दिलं आहे.
‘नॅशनल आयकॉन’ लोकांना मतदानाबाबत जागरूक करतात. त्यांच्या सांगण्यावरुन जास्तीत जास्त मंडळी मतदान करतात. राजकुमारआधी ऑगस्टमध्ये निवडणूक आयोगाने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला आपला नॅशनल आयकॉन बनवले होते. भारतात पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अधिकाधिक लोकांनी मतदानात सहभागी व्हावे अशी निवडणूक आयोगाची इच्छा आहे. तरुण मंडळींवर त्यांनी लक्ष केंद्रीत केलं आहे.