‘पठाण’ चित्रपट आणि त्यातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सुरू झालेला वाद दिवसागणिक आणखीनच वाढत आहे. दीपिकाने परिधान केलेली भगव्या रंगाच्या बिकिनीवरून सुरू झालेला हा वाद आता ‘बॉयकॉट पठाण’ या व्हायरल ट्रेंडपर्यंत येऊन पोहोचला आहे. सोशल मिडियावर याची जोरदार चर्चा आहे. अशातच एका आंतरराष्ट्रीय मासिकाने ५० महान अभिनेते आणि अभिनेत्री यांची यादी जाहीर केली आहे, आणि यात एकमेव भारतीय कलाकाराचं नाव आहे ते म्हणजे शाहरुख खान.
‘एंपायर मॅगजीन’ने नुकतंच ट्विटरच्या माध्यमातून जगातील ५० उत्कृष्ट नटांची यादी जाहीर केली आहे, आणि या यादीत केवळ एकाच भारतीय अभिनेत्याचा समावेश करण्यात आला आहे. शाहरुख खानचं नाव या यादीत पाहून त्याचे चाहते चांगलेच खुश झाले आहेत, त्यांनी लगेच सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल करायला सुरुवात केली आहे.
आणखी वाचा : “१० वर्षं मेहनत…” अर्जुन कपूरने सांगितला ‘कुत्ते’ चित्रपटात दिग्गज कलाकारांसह काम करण्याचा अनुभव
‘एंपायर मॅगजीन’च्या या लिस्टमध्ये टॉम क्रुज, अल पचीनो, टॉम हँक्स, जॅक निकोलसन, लियोनार्डो दीकॅप्रिओ, मॉर्गन फ्रीमन, गॅरी ओल्डमन, अशा दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. या दिग्गजांच्या मांदियाळीत भारताचं नेतृत्व करणाऱ्या शाहरुख खानचं नाव अभिमानास्पद आहे. या मासिकात शाहरुखच्या ‘कूछ कुछ होता है’, ‘देवदास’पासून ‘स्वदेस’सारख्या चित्रपटांमधील भूमिकेची प्रशंसा केली आहे.
शाहरुख नुकताच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. आता त्याच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहतायत. तब्बल ४ वर्षांनी शाहरुख पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. याबरोबरच शाहरुखचे ‘जवान’ आणि ‘डंकी’ हे चित्रपटही २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहेत.