बॉलीवूडची बोल्ड अभिनेत्री मल्लिका शेरावत आणि इमरान हाश्मी यांच्यातील भांडण अखेर २० वर्षांनी मिटलं आहे. दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात ते गळाभेट घेऊन एकमेकांबरोबर पोज देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ चित्रपट निर्माते आनंद पंडित यांच्या मुलीच्या रिसेप्शन सोहळ्यातला आहे. इमरान व मल्लिकाचं भांडण नेमकं का झालं होतं, ते जाणून घेऊयात.
२००४ साली आलेल्या इरॉटिक थ्रिलर चित्रपट ‘मर्डर’ मध्ये इमरान व मल्लिका यांनी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान इमरान व मल्लिका शेरावत यांच्यात भांडण झालं होतं. तेव्हापासून ते दोघेही एकमेकांशी बोलणं व भेटणं टाळायचे. बॉलीवूडमधील सुपरहिट ऑनस्क्रीन जोड्यांपैकी एक असलेले मल्लिका व इमरान आता अखेर २० वर्षांनी एका कार्यक्रमात भेटले. दोघांनी गळाभेट घेतली आणि एकत्र पोज दिल्या.
मुंबईत चित्रपट निर्माते आनंद पंडित यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हे दोघेही एकमेकांना बऱ्याच वर्षांनी भेटले. मल्लिका गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती, तर इमरानने काळ्या रंगाचा सूट घातला होता. मल्लिका पोज देत असताना इमरान तिथे आला, दोघेही एकमेकांशी बोलले, गळाभेट घेतली आणि नंतर त्यांनी पोज दिल्या. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ‘वरिंदर चावला’ या पापाराझी अकाउंटवर शेअर केलेला त्यांचा व्हिडीओ पाहिल्यावर चाहते ‘खूप छान’, ‘२० वर्षांनी या जोडीला एकत्र पाहतोय’, ‘दोघेही एकत्र छान दिसतात’, अशा कमेंट्स करत आहेत.
“रोडीजमुळे माझा घटस्फोट झाला,” प्रसिद्ध अभिनेत्याचं विधान; म्हणाला, “माझ्या वैयक्तिक आयुष्यात…”
मल्लिका इमरानबरोबरच्या भांडणाबद्दल काय म्हणाली होती?
२०२१ मध्ये मंदिरा बेदीला दिलेल्या मुलाखतीत मल्लिकाने इमरानसोबतच्या तिच्या भांडणाला बालिशपणा म्हटलं होतं. “सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे मर्डरनंतर इमरान व मी बोललो नाही आणि मला आता वाटतं की तो बालिशपणा होता. शूटिंग की प्रमोशन दरम्यान आमच्यात काहीतरी गैरसमज झाला होता. खरं तर तो आमचा दोघांचाही बालिशपणा होता,” असं मल्लिका म्हणाली होती. तर, ‘कॉफी विथ करण’ मध्ये इमरानने मल्लिका शेरावतला वाईट किस करते, असं म्हटलं होतं, त्यानंतर बराच गोंधळ झाला होता.