चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना अभिनयाचा वारसा लाभलेला आहे. बॉलीवूडचा अभिनेता इमरान हाश्मी हा त्यापैकीच एक आहे. अनेक चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्याच्या घरच्यांना त्याने अभिनय क्षेत्रात येऊ नये असे वाटत असल्याचे म्हटले आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री पूर्णिमा दास वर्मा या इमरान हाश्मीच्या आजी असून त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांत काम केले आहे. बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवणाऱ्या त्यांच्या घरातील त्या पहिल्या होत्या. १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘जंजीर’ या चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती. पण, या नामांकित अभिनेत्रीला आपल्या नातवाने करिअर म्हणून दुसरे क्षेत्र निवडावे असे वाटत होते. इमरान हाश्मीने याबद्दल बोलताना म्हटले आहे की, मी अभिनेता होण्यात माझ्या आजीचा माझ्यावर मोठा प्रभाव होता. पण, तिने आयुष्यात इतके चढउतार पाहिले होते की मला अभिनय क्षेत्रात जम बसवणे शक्य होईल की नाही, अशी भीती तिला वाटायची. मी अभिनय करू शकेन, यावर कोणाचा विश्वास नव्हता.
याविषयी अधिक बोलताना इमरान हाश्मीने म्हटले आहे की, मी मुळातच चांगला दिसत नव्हतो, मला डान्स करता येत नसे, इतर कोणत्या कला माझ्याकडे नव्हत्या. शाळेत असतानादेखील मी कोणती बक्षिसं मिळवली नव्हती, त्यामुळे आजीला मी अभिनेता होईल की नाही यावर शंका होती. पण, जेव्हा माझे काका महेश भट्ट यांनी विश्वास दाखवला आणि ‘फूटपाथ’ या चित्रपटातून मी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
पहिल्या चित्रपटाच्या वेळी महेश भट्ट यांचे शब्द आजही आठवत असल्याचे त्याने म्हटले आहे. इमरान हाश्मी म्हणतो, त्यावेळी त्यांनी मला सांगितले होते की, आपली सेवाभावी संस्था नाही; जर तू अभिनय करू शकला नाहीस आणि प्रेक्षकांना तुझा अभिनय आवडला नाही तर तुला चित्रपटातून काढून टाकेन. त्यांनी मला कधीही सांत्वना दिली नाही. ते इतके घाबरवायचे की, पुढचा व्यक्ती आवश्यक गोष्टी शिकून येईल, कौशल्ये आत्मसात करेल. त्यामुळे माझ्यामध्ये सुधारणा होण्यास मदत झाली. ज्यावेळी शूटिंग पूर्ण झाले, त्यावेळी महेश भट्ट माझ्या कामामुळे प्रभावित झाले होते. त्यांनी आजीसाठी स्क्रिनिंग ठेवले आणि तिला विश्वास दिला की मी अभिनय करू शकतो
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून इमरान हाश्मी मल्लिका शेरावतबरोबरच्या तुटलेल्या मैत्रीमुळे चर्चेत होता. ‘मर्डर’ चित्रपटादरम्यान त्यांच्यामध्ये भांडण झाले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान त्यांंनी गळाभेट घेत हे भांडण मिटवले. त्यानंतर ते भांडण म्हणजे एक मूर्खपणा असल्याचेदेखील वक्तव्य इमरानने केले होते.