बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत अभिनयासह तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती अनेक विषयांवर तिची मतं मांडत असते. लवकरच तिचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिने भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. प्रेक्षक कंगनाच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. कोविडदरम्यानच्या काळात आणि खासकरून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने इंडस्ट्रीतील नेपोटीजमवर जोरदार टीका करायला सुरुवात केली.
कंगनाच्या वादग्रस्त विधानांमुळे तिच्या चित्रपटांना बॉयकॉटचा सामना करावा लागला. बऱ्याच बड्याबड्या सेलिब्रिटीजनीदेखील कंगनाच्या वर्तणूकीवर टीका केली. आता नुकतंच बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी याने कंगनाबद्दल भाष्य केलं आहे. कंगनाच्या या वागण्यामुळेच तिला इंडस्ट्रीतून बॉयकॉट करण्यात आल्याचा खुलासाही त्याने या मुलाखतीदरम्यान केला.
आणखी वाचा : ‘शार्क टँक इंडिया’मधील ५०% डील्स या पूर्ण होतच नाहीत; खुद्द शार्क्सनीच व्यक्त केली खंत
‘दैनिक भास्कर’शी संवाद साधताना इमरान म्हणाला, “मला वैयक्तिकरित्या विचाराल तर एक माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून कंगना फार आवडते. चित्रपटसृष्टीत कदाचित तिला काही वाईट अनुभव आले असतील. मी कंगनाबरोबर ‘गँगस्टर’सारखा सुपरहीट चित्रपट दिला होता, त्यात माझी नकारात्मक भूमिका होती पण कंगना त्यात मुख्य भूमिकेत होती. त्यामुळे या इंडस्ट्रीबद्दल कंगनाचं मत नेमकं कधी बदललं, तिने सर्वांना नशेच्या अधीन असल्याचा दावा का केला किंवा घराणेशाहीविरोधात ती एवढी आक्रमक का झाली? याबद्दल मलाही ठाऊक नाही. ही फार बालिश गोष्ट आहे अन् यात काहीच तथ्य नाही.”
२०१६ पासूनच कंगनाने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर भाष्य करायल सुरुवात केली, इतकंच नव्हे तर तिने प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता व दिग्दर्शक करण जोहरला ‘मुव्ही माफिया’ म्हणूनही हिणवलं. कंगनाचे गेल्यावर्षी आलेले ‘धाकड’, ‘चंद्रमुखी २’, ‘तेजस’सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. एकापाठोपाठ चित्रपट फ्लॉप झाल्यावर कंगनाच्या ‘इमर्जन्सी’कडे लोकांच्या नजरा लागल्या आहेत. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.