इमरान हाश्मी (Emraan Hashmi) हा सध्या त्याच्या ‘ग्राऊंड झिरो’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरने धुमाकूळ घातला. इमरान हाश्मी या चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे मोठे कौतुक होताना दिसत आहे. आता मात्र अभिनेत्याने एका मुलाखतीत ज्यावेळी त्याच्या मुलाला कर्करोगाचे निदान झाले होते, त्यावेळी त्याची व त्याच्या पत्नीची भावनिक अवस्था काय होती, यावर वक्तव्य केले. तसेच ते मुलासमोर कधीही रडत नसत, असाही खुलासा त्याने केला.
त्यावेळी मूत्रपिंडाचा कर्करोग…
इमरान हाश्मीने नुकतीच रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये अभिनेत्याने त्याच्या व्यावसायिक, तसेच वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या अनेक बाबींसंबंधी वक्तव्य केले. जेव्हा मुलगा अयानला मूत्रपिंडाचा कर्करोग झाला होता, त्यावेळी काही तासांतच त्यांचे आयुष्य कसे बदलले यावर अभिनेता व्यक्त झाला. अभिनेता इमरान हाश्मी म्हणाला, “१३ जानेवारीला मी माझ्या कुटुंबासह ताज लँड्समध्ये ब्रंचसाठी गेलो होतो. त्यावेळी अयानमध्ये पहिल्यांदा कर्करोगाची लक्षणे दिसली. त्याच्या लघवीमधून रक्त येत होते. त्यानंतर आम्ही पुढच्या तीन तासांत त्याला दवाखान्यात घेऊन गेलो. त्यावेळी मूत्रपिंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्याच्यावर लगेचच उपचार सुरू केले.”
अभिनेता पुढे म्हणाला, “जेव्हा आम्हाला पहिल्यांदा याबद्दल समजले त्यावेळी आम्ही त्याच्यासमोर रडूही शकत नव्हतो. मी आणि माझी पत्नी एका खोलीत गेलो आणि तिथे रडलो. आम्हाला आमचे दु:ख त्याला दाखवायचे नव्हते, ज्यामुळे त्याच्या मानसिक आरोग्यावर काही परिणाम होईल. त्याचे मानसिक आरोग्य ठीक असणे सर्वांत महत्त्वाचे होते. त्याला बरे होण्यासाठी पुढची पाच वर्षे लागणार होती. त्यामुळे आम्हाला वाईट वाटत असल्याचे आम्ही त्याला कधीही दाखवले नाही. आम्ही कायम खंबीर राहिलो.”
इमरान हाश्मी पुढे म्हणाला की, मुलाला कर्करोगाचे निदान झाल्यानंतरची पुढील काही वर्षे माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होती. त्याला सतत दवाखान्यात जावे लागत असे. त्याच्या प्रकृतीबाबत चिंता होती. तो लवकरात लवकर बरा व्हावा, हीच एक आशा असायची. २०१४ साली इमरान हाश्मीच्या मुलाला कर्करोगाचे निदान झाले होते. आता त्याने कर्करोगावर मात केली आहे.
दरम्यान, इमरान हाश्मीची प्रमुख भूमिका असलेल्या ग्राऊंड झिरो या चित्रपटात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर, झोया हुसेन, मुकेश तिवारी, रॉकी रैना हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकात आहेत. हा चित्रपट २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.