रुपेरी पडद्यावर दिसणाऱ्या अनेक कलाकारांच्या जोड्यांना प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळताना दिसते. अशा जोड्यांचे चित्रपट पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहांत गर्दी करताना दिसतात. त्यापैकी एका जोडीबद्दल आजही बोलले जाते आणि ती म्हणजे इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांची जोडी. अनेक चित्रपटांमधून या जोडीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र, २००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मर्डर’ चित्रपटानंतर त्यांच्यामध्ये भांडण झाले आणि त्यांनी परत कधीही एकत्र काम केले नाही. त्यांच्यामधल्या या भांडणाची आजही चर्चा होताना दिसते.
‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत, इमरान हाश्मीने मल्लिका शेरावतबरोबरच्या भांडणाबद्दल वक्तव्य केले आहे. तो म्हणतो, “त्यावेळी आम्ही तरुण होतो आणि मूर्खसुद्धा होतो. तुमच्या आयुष्यात अशी एक वेळ येते, ज्यावेळी तुमची निर्णय घेण्याची ताकद खूप सीमित झालेली असते. अशा वेळी तुम्ही आवेशात असता आणि तुम्हाला लवकर राग येतो. आमचे भांडण झाले तेव्हा काही गोष्टी माझ्याकडून वाईट बोलल्या गेल्या होत्या आणि काही मल्लिकाकडून वाईट बोलल्या गेल्या होत्या. पण, या सगळ्या त्या वेळच्या गोष्टी आहेत. आता तो भूतकाळ आहे.”
काही दिवसांपूर्वीच मल्लिका शेरावत आणि इमरान हाश्मी यांनी एका कार्यक्रमादरम्यान एकमेकांची गळाभेट घेत, या भांडणाचा शेवट केला होता. त्यानंतर या दोघांनी फोटो काढले होते. त्यावेळी हे कलाकार मोठ्या चर्चेत आले होते. त्यावर इमरान हाश्मीने म्हटले आहे, “जे काही भूतकाळात झाले, ते आम्ही विसरलो आहोत. मल्लिकाला इतक्या दिवसांनंतर भेटून छान वाटले. ती माझी सहकलाकार आहे. आमचे भांडण झाले नसते, तर आम्ही पुन्हा एकत्र काम केले असते. भविष्यकाळात मला तिच्याबरोबर पुन्हा काम करायला आवडेल.” असेही त्याने म्हटले आहे.
मल्लिका शेरावतनेदेखील याआधी तिच्या आणि इमरान हाश्मीच्या भांडणाबाबत २०२१ मध्ये मंदिरा बेदीला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केले होते. तिने म्हटले होते, “आमचे भांडण म्हणजे बालिशपणा होता. ‘मर्डर’ चित्रपटाच्या शूटिंग की प्रमोशनदरम्यान आमच्यात गैरसमज झाला होता आणि आमचे भांडण झाले.
दरम्यान, चित्रपट निर्माते आनंद पंडित यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हे दोघेही एकमेकांना बऱ्याच वर्षांनी भेटले. त्यावेळी त्यांनी काढलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत २० वर्षांनी या जोडीला एकत्र पाहिल्याचे म्हटले आहे; तर अनेकांनी हे दोघे आजही एकत्र छान दिसतात, असेही म्हटले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.