मनोरंजनसृष्टीतील प्रेम प्रकरणं जितकी चर्चेत असतात त्याहून कित्येक पटीने अधिक सेलिब्रिटीजच्या घटस्फोटाची चर्चा होते. बॉलिवूडमध्ये हा प्रकार आपल्याला वरचेवर पाहायला मिळतो. हेमा मालिनी व धर्मेंद्र यांनी मोठी मुलगी ईशा देओलने पती भरत तख्तानीपासून विभक्त झाल्याचे जाहीर केले. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगत असून त्याविषयी सतत काहीतरी नवनवीन गोष्टी कानावर पडत आहेत.
ईशा व भरत यांचं लग्न २९ जून २०१२ रोजी साध्या पद्धतीने इस्कॉन मंदिरात झालं होतं. या जोडप्याला राध्या व मिराया नावाच्या दोन मुली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ईशा पती भरत तख्तानीपासून विभक्त झाल्याच्या चर्चा होत होत्या. अखेर दोघांनी दिल्ली टाइम्सला निवेदन देत घटस्फोटावर शिक्कामोर्तब केलंय. लग्नाच्या ११ वर्षानंतर परस्पर संमतीने वेगळे होत आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. आता मात्र आणखी वेगळ्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.
आणखी वाचा : “मलाही ओरीसारखं…” मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशीचं विधान चर्चेत
ईशाला तिच्या सासरी घरात बरीच बंधनं होती, तसेच तिला घरात शॉर्ट कपडे परिधान करायलाही परवानगी नव्हती अशा गोष्टी समोर येत आहेत. २०२० साली प्रकाशित झालेल्या ‘अम्मा मिया’ या आपल्या पुस्तकात खुद्द ईशानेच या गोष्टींचा खुलासा केल्याचं स्पष्ट झालं आहे. लग्नानंतर ईशा अधिक जबाबदार मुलीसारखी वागू लागली हेदेखील तिने तिच्या या पुस्तकात लिहिलं होतं. पुस्तकात ईशाने लिहिलं, “लग्नानंतर नक्कीच माझ्याही आयुष्यात बरेच बदल झाले. जेव्हा मी या कुटुंबात राहायला आले तेव्हा मी माझ्या घरात जशी वावरायचे तसं इथे वावरता येणं शक्य नव्हतं. मला या घरात शॉर्ट कपडे घालायला परवानगी नव्हती.”
याच पुस्तकात ईशाने तिच्या सासरचं बरंच कौतुकही केलं आहे. ईशाला त्या घरातील सदस्याप्रमाणेच वागणूक मिळाली होती. इतकंच नव्हे तर ईशाला कोणताही पदार्थ बनवता येत नव्हता, त्यावेळी लग्न झाल्यानंतर ईशाच्या सासूने तिला स्वयंपाक यायलाच हवा असं बंधनही तिच्यावर कधीच घातली नाही. ईशाने अशा बऱ्याच गोष्टींचा खुलासा तिच्या या पुस्तकात केला आहे.