९० च्या दशकात भारतात पॉप कल्चर रुजायला सुरुवात झाली. चित्रपटांबरोबरच वेगवेगळ्या गायकांचे स्वतंत्र अल्बम बाजारात आले आणि यातूनच कित्येक गायकांना प्रसिद्धी मिळाली. शान, सोनू निगम, लकी अली, फाल्गुनी पाठक अशा कित्येक गायकांना यातून ओळख मिळाली. याचदरम्यान डॉ. पलाश सेन यांच्या ‘मायेरी’ ह्या एकाच गाण्याने कित्येकांच्या मनावर गारुड केलं होतं. ‘Euphoria’ या लोकप्रिय बॅन्डबद्दल त्या काळातच लोकांना माहिती झाली अन् एका गाण्यामुळे पलाश सेन यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
एवढी प्रसिद्धी मिळूनही पलाश यांनी क्वचितच बॉलिवूड चित्रपटांसाठी गाणी गायली. नुकतंच ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या या मुलाखतीमध्ये त्यांनी याबद्दल खुलासा केला आहे. एक स्वतंत्र कलाकार असण्याचे फायदे आणि तोटे त्यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितले. शिवाय याआधीही इंडस्ट्रीतील लोकांचे तळवे चाटणं मला पटत नाही असं विधानही पलाश यांनी केलं होता. भारतीय संगीतसृष्टी ही चित्रपटांच्या कशी आधीन गेली आहे आणि एकूणच म्युझिक माफिया अन् त्यांच्या कारभाराबद्दल पलाश यांनी या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
पलाश म्हणाले, “म्युझिक माफिया आहेतच, आपल्याकडे म्युझिक इंडस्ट्रीकडे स्वतंत्रपणे कुणीच बघत नाही. आपल्याकडे एक चित्रपटसृष्टी आहे आणि म्युझिक इंडस्ट्री तिचा एक छोटासा भाग आहे. त्यातली काही एक दोन म्युझिक लेबल्स (कंपन्या) आहेत ज्यांचं या संपूर्ण इंडस्ट्रीवर वर्चस्व आहे, ज्याला माफिया असं म्हणतात. या क्षेत्रात स्वतंत्रता नाही. संपूर्ण इंडस्ट्रीची सूत्रं काही एक दोन लोकांच्याच हातात असल्याने त्यात कल्पकता कमी झाली. तीच गाणी, तीच चाल, तेच शब्द, तोच आवाज कारण म्युझिक लेबल्सना त्यांना मार्केट करायचं आहे. यामुळे एका पॉइंटनंतर ओरिजिनल गाणी बनणं बंद झालं, अन् आता तर रिमेकचा जमाना सुरू आहे.”
याबरोबरच यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दल पलाश म्हणाले, “यूट्यूब हे स्वतंत्र कलाकारासाठी, गायकांसाठी वरदान आहे पण आता त्यालासुद्धा फिल्म इंडस्ट्रीने विकत घेतलं आहे. फक्त यूट्यूबच नव्हे तर सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांनी विकत घेतले आहेत. जशी तुम्हाला लोकप्रियता मिळायला सुरुवात होते तसे हे तुमच्याकडून पैसे उकळायला लागतात. पहिलं गाणं, व्हिडिओ तुमचा चांगला चालतो, पण मग नंतर या म्युझिक माफियाला दक्षिणा दिल्याशिवाय तुमची कोणतीही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचणार नाही हे सत्य आहे.”