पहलाज निहलानी हे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे ज्याला भारतात सामान्य लोक सेन्सॉर बोर्ड असंही म्हणतात त्या संस्थेचे माजी अध्यक्ष आहेत. याबरोबरच ते एक चित्रपट निर्माते आहेत आणि २००९ पर्यंत पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्यूसर असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही काम केले होते. मध्यंतरी ‘पठाण’मधील भगव्या बिकिनीवरुन झालेल्या वादामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते.
आता पुन्हा त्यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्यामुळे पहलाज निहलानी चर्चेत आले आहेत. ‘बॉलिवूड हंगामा’शी संवाद साधताना इतकी वर्षं चित्रपटक्षेत्रात काम करण्याच्या अनुभवाबद्दल खुलासा केला आहे. याबरोबरच सध्याच्या चित्रपटांची निवड आणि एकूणच ओटीटी प्लॅटफॉर्मची मक्तेदारी यावरही पहलाज निहलानी यांनी भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : भारतीय मुलींना आळशी म्हणणाऱ्या सोनाली कुलकर्णीचं ट्रोलर्सना उत्तर; म्हणाली “कालच्या घटनेतून…”
मुलाखतीदरम्यान ते म्हणाले, “मोठमोठ्या स्टर्सचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले तरी काही ओटीटी प्लॅटफॉर्म मात्र त्या चित्रपटांना डोक्यावर घेत आहेत, तो चित्रपट एवढ्या लाखों करोडो लोकांनी बघितल्याचा दावा करत आहेत. त्यांना हे आकडे नेमके मिळतायत कुठून हा मला प्रश्न पडला आहे. जो चित्रपट १० मिनिटंही प्रेक्षक सहन करू शकत नाही, अशा चित्रपटांना सर्वात जास्त पाहिला गेलेला चित्रपट म्हणून बिरुद लावण्यात येत आहे. ते नेमके प्रेक्षकांना मूर्ख बनवतायत की स्वतःला हेच मला कळत नाही.”
याबरोबरच हे ओटीटी प्लॅटफॉर्म सेन्सॉर बोर्डच्या अखत्यारीत येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आणि हा खूप मोठा मुद्दा असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. हलाज निहलानी हे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष असताना बऱ्याच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असायचे. आता या संस्थेचे अध्यक्ष लेखक, गीतकार प्रसून जोशी आहेत.