Aakash Chopra on Chhava Movie: अभिनेता विकी कौशलने ‘छावा’ चित्रपटात साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अनेकांना आवडत असून सध्या चित्रपटाला लोक गर्दी करत आहेत. सामान्य चाहतेच नाही तर सेलिब्रिटीही चित्रपटाचे कौतुक करत त्यावर पोस्ट टाकत आहेत. माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनीही नुकताच छावा चित्रपट पाहिला. त्यावर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
मात्र त्यांच्या प्रश्नानंतर आता एक्सवर जोरदार चर्चा झडत आहे. आकाश चोप्रा यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले, “मी छावा चित्रपट पाहिला. शौर्य आणि अतुलनीय पराक्रम, देशाप्रती कर्तव्य दाखविताना ज्या निस्वार्थी वृत्तीचे दर्शन झाले, त्यावरून मला काही प्रश्न पडले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आम्हाला शाळेत का नाही शिकवला गेला?”
आकाश चोप्रा यांनी पुढे लिहिले, “छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तर नाहीच नाही पण त्यांचा साधा उल्लेखही कुठे नाही. आपल्याला अकबर कसा मोठा आणि न्यायप्रिय राजा होता, हे शिकवले गेले. तर राजधानी दिल्लीत एका रस्त्याचे नाव औरंगजेब आहे. हे सर्व का आणि कसे घडले?”
आकाश चोप्रा यांच्या या मतप्रदर्शनानंतर एक्सवर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने थेट आकाश चोप्रावर टीका केली आहे. त्याने लिहिले, “तू क्रिकेटर म्हणून अपयशी होतासच, पण आता तू इतिहासातही नापास झालेला दिसतोस” या पोस्टला आकाश चोप्राने उत्तर दिले. ते म्हणाले, “बारावीला मी माझ्या शाळेतून पहिला आलो होतो, इतिहासात मला ८० टक्के गुण होते. धन्यवाद..”
काही युजर्सनी आकाश चोप्रा यांच्या विधानाचे स्वागत केले आहे. तर काहींनी तू या धार्मिक वादात पडू नकोस, असा सल्ला दिला आहे.
‘छावा’ चित्रपट हा लेखक शिवाजी सावंत यांच्या छावा कांदबरीवर बेतलेला आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. तसेच ज्याप्रकारे चित्रपटाला प्रसिद्धी मिळत आहे, त्याप्रमाणे हा चित्रपट आणखी काही दिवस तिकीट खिडकीवर धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.