नाना पाटेकरांनी एका चाहत्याला डोक्यावर मारलं होतं. त्यावरून बराच वादंग निर्माण झाला. नाना पाटेकरांसह चित्रपटाच्या दिग्दर्शकानेही यावर स्पष्टीकरण दिलं होतं. नानांनी तर माफीही मागितली होती. याप्रकरणी अखेर तो चाहता समोर आला अन् त्याने याबाबत प्रतिक्रियाही दिली होती. हा एका चित्रपटातील सीन असल्याचं स्पष्टीकरण सर्वप्रथम दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी दिलं होतं.
नाना पाटेकरांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता मात्र या प्रकरणाने एक वेगळंच वळण घेतलं आहे. माजी आयएएस अधिकारी अभिषेक सिंग यांनी या प्रकरणावर नुकतंच भाष्य केलं आहे नाना पाटेकर यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. इतकंच नव्हे तर यापुढे नाना यांना उत्तरप्रदेशमध्ये कशी वागणूक मिळेल याबाबतीतही त्यांनी सावध केलं आहे.
अभिषेक यांचा हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. आपल्या व्हिडीओमध्ये ते म्हणाल, “गेल्या काही दिवसांपासून मीडियामधून ही बातमी समोर आली आहे की मी नाना पाटेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मी अद्याप अजून तसं काही केलेलं नाही. मी केवळ एवढंच सांगितलं की जेव्हा तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये शूटिंगसाठी येता तेव्हा इथलं सरकार तुम्हाला सवलती देतं, लोक तुम्हाला प्रेम आणि सन्मानाने वागवतात. याउलट तुम्ही जर आम्हाला थोबडावणार असाल तर मी सांगू इच्छितो की उत्तर प्रदेशच्या लोकांना अतिशय योग्य पद्धतीने उत्तर देता येतं.”
पुढे ते म्हणाले, “युपीमध्ये जेव्हा तुम्ही पुन्हा याल तेव्हा तुमच्याशी उत्तम व्यवहार केला जाणार नाही याची विशेष काळजी आम्ही घेऊ. शिवाय इतर जे कुणी कलाकार इथे येऊ इच्छितात त्यांना एकच विनंती आहे की तुमचं उत्तम चरित्र घेऊनच येथे या.” जेव्हा हा प्रकार घडला होता तेव्हा अभिषेक सिंग यांनी पुढे येऊन नाना यांच्या या वर्तणूकीवर टीका केली होती. इतकंच नव्हे तर पीडित तरुण जर त्यांच्याकडे तक्रार घेऊन आला तर ते पोलिसांत तक्रार करतील असंही भाष्य त्यांनी केलं होतं. आता मात्र त्यांनी असं काहीच न करता एका व्हिडीओच्या माध्यमातून नाना पाटेकर यांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.