हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून ८०च्या दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे टिकू तलसानिया हे सध्या एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहेत. ९० चं दशक गाजवणारे, २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या टिकू तलसानिया यांच्याकडे सध्या काहीच काम नाहीये. नुकतंच ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये टिकू यांनी याबद्दल खंत व्यक्त केली.
आपल्याला काम का मिळत नाही याविषयी टिकू म्हणाले, “फॉर्म्युला चित्रपटांचा काळ आता गेला. त्यात कॅबरे डान्स असायचा, दोन प्रेमगीते असायची आणि मग कॉमेडियन येऊन त्याचे काम करायचे आणि निघून जायचे. आता हे संपूर्ण चित्रच बदललेलं आहे. आता कथेला महत्त्व दिले जाते. जोपर्यंत तुम्ही कथेचा एक भाग असाल तोवरच तुम्हाला महत्त्व आहे. मी सध्या थोडा बेरोजगार आहे. मला काम करायचे आहे, पण योग्य भूमिका मिळत नाही.”
आणखी वाचा : बॉलिवूडच्या ‘स्टार सिस्टम’वर तापसी पन्नूची टीका; म्हणाली, “आमचा चित्रपट ‘जवान’सारखा…”
पुढे याविषयी बोलताना टिकू म्हणाले, “मी रोज कामाच्या शोधात असतो. माझा स्वतःचा एजंट नेमला आहे, एक टीम आहे जी उत्तम कथा आणि नाटक शोधत असतात. ती मंडळी मला काम असल्यास शोधून कळवतात आणि जर ऑडिशनची गरज असेल तर मी जाऊन ऑडिशनही देतो. काळानुसार गोष्टी बदलल्या आहेत, पण धीर धरावा लागेल.”
कोविडनंतर एकूणच सगळ्याच कलाकारांच्या आयुष्यात बदल झाले तसेच टिकू यांनाही त्याचा फटका बसलाच. याबद्दल ते पुढे म्हणतात, “कोविडनंतर कामाचे एकंदर गणितच बिघडले आहे. आता लोक पुढारले आहेत तसेच काम मागायची पद्धतही बदलली आहे, मला हे फार आवडत आहे. लोक मला संपर्क करतील याची मी वाट पाहत आहे. मी फिलर्ससुद्धा पाठवत आहे की मी एक अभिनेता आहे ज्याला कामाची गरज आहे. तुमची भूमिका चांगली असेल तर मला ती करायला नक्कीच आवडेल”
टिकू तलसानियाने म्हणाले की, सध्या ते फारसे चित्रपट करत नाहीत. ते आपली उर्वरीत शक्ती आणि वेळ नाटकासाठी राखून ठेवतात. टिकू गेल्या काही दिवसांपासून गुजराती थिएटर करत आहेत. तिथूनच त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली. २५० चित्रपट केल्यानंतर वयाच्या ६९ व्या वर्षी काम मागावे लागणारे टिकू हे पहिले कलाकार नाहीत. नीना गुप्ता यांनी २०१७ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून काम मागितले होते. त्यानंतर ‘बधाई हो’ चित्रपटात नीना यांना काम मिळाले व त्यांचे आयुष्य एका झटक्यात बदलले.