दिवंगत राजीव कपूर हे ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे धाकटे भाऊ होते. ५७ व्या वर्षी त्यांचे २०२१ मध्ये निधन झाले. कर्करोगाने ऋषी यांचे निधन झाल्यानंतर वर्षाभराने हृदयविकाराच्या झटक्याने राजीव यांनी अखेरचा श्वास घेतला. राजीव यांची अभिनेत्री खुशबू सुंदरशी खूप चांगली मैत्री होती. राजीव कपूर खूप मद्यपान करायचे आणि त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला, असं खुशबू सुंदर म्हणाल्या. “त्यांना हृदयाशी संबंधित काही समस्या होत्या, त्याचं कारण दारूचं व्यसन होतं. त्यांची ही सवय आम्ही सोडवू शकलो नाही,” अशी खंत खुशबू सुंदर यांनी व्यक्त केली.
“राजीव यांना गुडघ्याचा त्रास होता, त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यांची तब्येत बिघडली आहे याबद्दल आम्हाला माहीत होतं. त्यांचं निधन झालं, तेव्हा मी मुंबईत होते. त्यांच्या निधनाची माहिती मला बोनी कपूर यांनी दिली. त्यांनी मला फोन करून सांगितलं, ‘चिंपू आता हयात नाही’. हे ऐकून मला धक्का बसला होता,” असं विकी ललवाणीशी बोलताना खुशबू सुंदर यांनी सांगितलं.
निधनाच्या एक दिवसाआधी झालेलं बोलणं
राजीव यांच्या निधनाच्या एक दिवसाआधी त्यांच्याशी बोलणं झालं होतं, असं खुशबू सुंदर यांनी सांगितलं. “मी चिंपूशी (राजीव कपूर यांना खुशबू सुंदर चिंपू म्हणतात) त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी बोलले होते. तेव्हा करोना होता, त्यांना खूप ताप आला होता. आजारी असूनही, ते नेहमीप्रमाणे बोलत होते. त्यांनी मला लवकरच भेटण्याचं वचन दिलं होतं,” असं खुशबू सुंदर म्हणाल्या.
खुशबू व राजीव यांची घट्ट मैत्री होती, ते खूपदा एकत्र जेवायला जायचे. “त्यांच्या मृत्यूने मला धक्का बसला. कारण त्यांच्यासारखा मित्र मिळणं आता खूप दुर्मिळ आहे. आम्हाला अजूनही वाटतं की ते आमच्याबरोबर आहे,” असं खुशबू सुंदर म्हणाल्या.
१९८३ मध्ये सांगितलेली ती गोष्ट आजही लक्षात
खुशबू यांनी अजूनही राजीव यांचा फोन नंबर डिलीट केलेला नाही. मात्र, त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात राहू न शकल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. राजीव कपूरबरोबरच्या मैत्रीबद्दल खुशबू सुंदर म्हणाल्या, “त्यांनी मला खूप गोष्टी शिकवल्या आहेत. मी माझ्या पायाच्या बोटांवर पांढरे नेल पेंट लावते, कारण चिंपूने (राजीव कपूर) मला एकदा सांगितले होतं की तो रंग क्लासी दिसतो. हे त्यांनी मला १९८३ मध्ये सांगितलं होतं आणि आजपर्यंत मी त्याच रंगाचे नेल पेंट लावते. माझी चालण्याची पद्धत त्यांना आवडत नव्हतं, त्यामुळे त्यांनी मला कोणताही आवाज न करता, कसं चालायचं हे शिकवलं.”
‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान खुशबू सुंदर व राजीव कपूर यांची मैत्री झाली. राज कपूर यांनी खुशबू सुंदर यांना १९८५ साली या सिनेमातून लाँच करायचा निर्णय घेतला होता. पण त्यावेळी खुशबू यांचे वय फक्त १४ वर्षे होते, त्यामुळे त्यांनी अभिनेत्री मंदाकिनीला मुख्य भूमिकेत घेतलं.