बॉलीवूड पार्ट्या नेमक्या कशा असतात, या पार्ट्यांमध्ये सेलिब्रिटी कशी धमाल करतात याबद्दल चाहत्यांच्या मनात नेहमीच उत्सुकता असते. बॉलीवूड सेलिब्रिटींच्या कार्यक्रमांमध्ये डीजे वाजवणारा लोकप्रिय डीजे अकील याने अलीकडेच याविषयी सिद्धार्थ कन्ननशी संवाद साधला. यावेळी अकीलने सध्या परिस्थिती कशी बदललीये आणि आधी सगळे सेलिब्रिटी कसे निर्धास्त होऊन पार्ट्या करायचे याबद्दल खुलासा केला आहे.
अकील म्हणाला, “मी अनेक सेलिब्रिटींच्या खाजगी पार्ट्यांमध्ये डीजे वाजवला आहे. या प्रायव्हेट पार्ट्या त्यांच्या फार्महाऊसवर, घरात किंवा बोटीवर आयोजित केल्या जायच्या. घरगुती पार्ट्यांमध्ये सुद्धा त्यांचे अनेक नियम असायचे. कोणत्याही डीजेच्या वायर्स दिसल्या नाही पाहिजेत वगैरे…यासाठी मला पार्टी सुरू होण्याआधी तीन तास जाऊन सगळी व्यवस्था करावी लागायची. मी तासनतास नॉनस्टॉप गाणी वाजवायचो.”
अकील डीजे पुढे म्हणाला, “कलाकारांच्या घरच्या पार्ट्या मस्त असायच्या…कुठेही लाइट्स, कॅमेरा वगैरे याची त्यांना भीती नसायची. प्रत्येकाला त्यांचा खाजगी वेळ यामुळे अनुभवायला मिळायचा. सगळे सेलिब्रिटी हाऊस पार्टीला धमाल करायचे. ज्यावेळी तुम्हाला कॅप्चर करणारा कॅमेरा तुमच्या आजूबाजूला नसतो, तेव्हा तुम्ही निर्धास्त होता. हे सेलिब्रिटी सुद्धा घरातील पार्ट्यांना दारू पिऊन धमाल, तुफान पार्टी करायचे. आजकाल सेलिब्रिटी घराबाहेर जायला सुद्धा घाबरतात पण, आधी असं नव्हतं. त्यावेळी सोशल मीडियाचा एवढा प्रभाव नव्हता, त्यामुळे सर्वांचा वेळ खूप छान जायचा.”
स्टार सेलिब्रिटींबद्दल अकील सांगतो, “मुंबईतील एका नामांकित क्लबमध्ये माझा पहिला व्यावसायिक कार्यक्रम झाला होता. याठिकाणी सलमान खान, हृतिक रोशन आणि बच्चन कुटुंबीय यायचे. सलमान खान, अभिषेक बच्चन, फरदीन खान, हृतिक रोशन, जॉन अब्राहम, डिनो मोरिया अगदी तुम्ही नाव घ्या, ते सगळे सेलिब्रिटी तिथे असायचे. सिनियर आणि ज्युनियर दोन्ही बच्चन एकत्र पार्टी करायचे. आजूबाजूला कॅमेरा नसल्यामुळे त्यांचा वेळ खूप छान जायचा”
“सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे आता तशा पार्ट्या होतच नाहीत. आता सगळे सेलिब्रिटी साधं क्लबमध्ये प्रवेश करायला सुद्धा घाबरतात. कारण, प्रत्येक चाहत्याला त्यांच्याबरोबर फोटो काढायचे असतात. त्यांना याच्यामुळे त्रास होतो, असं मानसिक समाधान मिळत नाही. पूर्वी असा कोणताही ताण नव्हता. ते सगळे यायचे दारू पिऊन मस्त पार्टी करायचे, सगळ्या हिरोंच्या सुपरहिट गाण्यांवर डान्स करायचे आणि घरी जायचे आता हे सगळं खूप बदललं आहे” असं अकीलने सांगितलं.