गायक व संगीतकार अमाल मलिक(Amaal Mallik)ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहेत. या पोस्टमध्ये त्याने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. तो क्लिनिकल डिप्रेशनचा सामना करत असल्याचा खुलासा त्याने केला आहे. त्याच्या या अवस्थेला त्याचे कुटुंब त्याचे आई-वडील जबाबदार असल्याचे त्याने म्हटले आहे. याबरोबरच, त्याचा भाऊ अरमान मलिक( व त्याच्यात दुरावा येण्यासाठी त्याचे पालक जबाबदार असल्याचे अमाल मलिकने त्याच्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. तो त्याच्या कुटुंबाबरोबर संबंध पूर्णपणे तोडून टाकत असल्याचेदेखील त्याने स्पष्ट केले आहे.
अमाल मलिकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले, “मी आता अशा टप्प्यावर पोहोचलो आहे की, मी ज्या वेदना निमूटपणे सहन केल्या आहेत त्याबद्दल मी शांत बसू शकत नाही. माझ्या लोकांचे आयुष्य सुरक्षित बनविण्यासाठी मी रात्रंदिवस कष्ट केले; पण तरीही मला कमी लेखले गेले. गेल्या दशकभरात १२६ गाणी जी रिलीज केली आहेत, त्या प्रत्येक गाण्यासाठी मी माझे रक्त आटवले आहे, घाम गाळला आहे, अश्रू खर्च केले आहेत. त्यासाठी मी माझी स्वत:ची स्वप्नं बाजूला ठेवली आहेत. त्यांनी जगासमोर ताठ मानेनं जगावं यासाठी मी कष्ट केले आहेत.”
अमालने त्याच्या व भाऊ अरमानच्या इंडस्ट्रीमधील प्रवासाबद्दल लिहिले, “आज आमची जी ओळख आहे, ती तयार करण्यासाठी तसेच अमुक एकाचा मुलगा व पुतण्या ही ओळख मिटवण्यासाठी मी माझ्या भावाबरोबर गाण्याच्या क्षेत्रात कष्ट केले आहेत. मी व अरमाननं इंडस्ट्रीमध्ये चांगलं काम केलं आहे. पण माझ्या पालकांच्या कृतीमुळे माझ्यात व अरमानमध्ये दुरावा आला आहे. मी व माझा भाऊ एकमेकांपासून दूर जाण्याला माझे पालक जबाबदार आहेत. आम्ही एकमेकांपासून खूप दूर गेलो आहोत. त्याचे मला सर्वात जास्त दु:ख आहे” पुढे अमाल म्हणाला, “गेल्या काही वर्षांत त्यांनी माझा आत्मविश्वास, माझी मैत्री, माझे रिलेशनशिप, माझी मन:स्थिती बिघडवण्याची व मला त्रास देण्याची एकही संधी सोडली नाही.
अमाल मलिकने त्याच्या क्लिनिकल डिप्रेशनबद्दल खुलासा करताना लिहिले, “आज मी अशा टप्प्यावर आहे जिथे माझी शांतता हिरावून घेतली आहे. मी भावनिकरीत्या थकलो आहे आणि कदाचित आर्थिकदृष्ट्याही मी रिकामा झालो आहे. पण, या सगळ्यात कमी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. महत्त्वाचे हे आहे की, या सगळ्या घटनांमुळे मी क्लिनिकल डिप्रेशनमध्ये गेलो आहे. मी माझ्या कृतींसाठी फक्त स्वत:लाच जबाबदार धरतो. पण, माझ्या जवळच्या लोकांमुळे असंख्य वेळा माझी किंमत कमी झाली आहे. “
कुटुंबाशी नाते संपवत असल्याचे स्पष्ट करीत अमाल मलिकने म्हटले, “आतापासून माझे माझ्या कुटुंबाशी संबंध फक्त हे व्यावसायिकदृष्ट्या असतील. हा रागात घेतलेला निर्णय नाही. पण, स्वत:ला बरे करण्याच्या आणि आयुष्य नव्याने जगण्याच्या गरजेतून घेतलेला निर्णय आहे. माझ्या भूतकाळाने माझा भविष्यकाळ आणखी हिरावून घ्यावा, यासाठी मी तयार नाही. माझं आयुष्य शांततापूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी मी बांधील आहे.”