नाना पाटेकरांनी एका चाहत्याला डोक्यावर मारलं होतं. त्यावरून बराच वादंग निर्माण झाला. नाना पाटेकरांसह चित्रपटाच्या दिग्दर्शकानेही यावर स्पष्टीकरण दिलं होतं. नानांनी तर माफीही मागितली होती. याप्रकरणी अखेर तो चाहता समोर आला असून त्याने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पाटेकर शूटिंग करत असताना त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न एका चाहत्याने केला. या तरुणाला नाना पाटेकरांनी डोक्यावर जोरात मारलं आणि त्याच्यावर ओरडून ते त्याला निघून जायला सांगतात. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा चित्रपटाचा सीन होता, रिहर्सल करताना आपण चुकून त्याला मारलं असं नाना म्हणाले होते. पण त्या तरुणाने सांगितलं की तो चित्रपटाच्या शूटिंगचा भाग नव्हता आणि नाना पाटेकरांनी भर गर्दीत मारून त्याचा अपमान केला
तरुण म्हणाला, “मी गंगा नदीत डुबकी मारायला गेलो होतो आणि जेव्हा मी नाना पाटेकरांना तिथे शूटिंग करताना पाहिलं तेव्हा मला आनंद झाला. ते माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहेत, म्हणून मला फक्त त्यांच्याबरोबर एक फोटो काढायचा होता, पण त्याऐवजी, त्यांनी मला मारलं आणि तिथून पळवून लावलं.”
नाना पाटेकरांनी सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याच्या डोक्यावर जोरात मारला फटका, व्हिडीओ व्हायरल
तो पुढे म्हणाला, “तिथे उपस्थित असलेल्या गार्ड आणि इतर क्रू मेंबर्सनी मला अभिनेत्याजवळ जाण्यापासून आणि शूटमध्ये अडथळा आणण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु मी फोटोसाठी नानांकडे धाव घेतली. मी चित्रपटात कोणतीही भूमिका करत नाहीये. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि नानांच्या वागण्याने मला अपमानास्पद वाटत आहे. मी चित्रपटाच्या शुटिंगचा भाग नव्हतो. मला मारून तिथून हाकलून लावण्यात आलं. नाना पाटेकरांनी मला मारून माझा अपमान केला.” यांसदर्भात फ्री प्रेस जर्नलने वृत्त दिलंय.
नाना पाटेकरांनी मागितली माफी –
व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नाना पाटेकर म्हणाले, “एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात मी एका मुलाला मारतोय. हा सीन आमच्या चित्रपटाचाच भाग आहे. आम्ही एक रिहर्सल केली होती. त्यात पाठीमागून एक जण म्हणतो ‘ए म्हाताऱ्या टोपी विकायची आहे का?’ मी त्यात टोपी घालून असतो. तो येतो मी त्याला पकडून मारतो आणि ‘नीट वाग, उद्धट बोलून नकोस’ असं म्हणतो. त्यानंतर तो जातो. एक रिहर्सल केली, नंतर दिग्दर्शकाने पुन्हा रिहर्सल करायला सांगितलं. आम्ही सुरू करणार इतक्यात या व्हिडीओत दिसणारा मुलगा तिथे आला. मला माहीत नव्हतं की हा मुलगा कोण आहे, मला वाटलं आमच्या टीममधला आहे. त्यामुळे सीननुसार मी त्याला मारलं आणि माझा डायलॉग म्हटला. नंतर मला कळालं की हा आमच्या टीममधला माणूस नाही. मग मी त्याला बोलवायला जात होतो, पण तो पळून गेला. या व्हिडीओमुळे कोणताही गैरसमज झाला असेल तर मला माफ करा, मी असं कधीच कुणाला मारत नाही”