गेल्या काही महिन्यात ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आला. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यासाठी अनेकांनी आवाज उठवला होता. परंतु ‘बॉयकॉट बॉलिवूड’ ट्रेंडचा ‘ब्रह्मास्त्र’वर काहीही परिणाम झाला नाही. याउलट या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली.
‘ब्रह्मास्त्र १’चे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन किती आहे, यावरून अजूनही प्रेक्षकांच्या मनात संभ्रम आहे. मात्र ज्यांना हा चित्रपट आवडला आहे ते याच्या सिक्वेलची वाट पाहू लागले आहेत. अशातच ‘ब्रह्मास्त्र २’वरून आता नवा वाद सुरु झाला आहे.
चाहत्यांमध्ये ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये देवाची भूमिका कोण साकारणार, याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. पण आता ती फक्त चर्चा राहिली नसून सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये वाद सुरु झाला आहे. ‘ब्रह्मास्त्र’ही शिवाची कथा आणि आणि पहिल्या भागात ही भूमिका रणबीर कपूरने साकारली आहे. चित्रपटात उल्लेख केल्याप्रमाणे, शिवाचे वडील देव आहेत आणि ब्रह्मास्त्रमध्ये काही सीन्समध्ये देवची झलक देखील पहायला मिळते. परंतु कोणता बॉलिवूड स्टार ही भूमिका साकारणार आहे हे स्पष्ट झालेले नाही.
या भूमिकेसाठी हृतिक रोशन आणि रणवीर सिंग ही नावे पहिल्या दिवसापासून चर्चेत आहेत. पण हृतिक त्याच्या होम प्रोडक्शनचा चित्रपट ‘क्रिश ४’ची तयारी करत असल्याने तो सुपरहिरोवर आधारित आणखी चित्रपट करणार नाही. अशा परिस्थितीत देवच्या भूमिकेसाठी एकमेव दावेदार रणवीर सिंग आहे. पण आता अचानक काही चाहते सोशल मीडियावर रणबीर कपूरच ‘ब्रह्मास्त्र’च्या तिन्ही भागात दुहेरी भूमिका साकारणार आहे आणि पुढच्या भागात तो शिवाच्या वडिलांच्या म्हणजेच देवच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच ‘ब्रह्मास्त्र’च्या शेवटी दिसणारी देवची प्रतिमा नीट पाहिली तर त्याच्या नाकावरून कळेल की तो रणवीर सिंग किंवा अन्य कोणी नसून रणबीर कपूर आहे.
हेही वाचा : रणबीर कपूरच्या ‘त्या’ कृतीमुळे सेटवरच रडू लागली रश्मिका मंदाना, म्हणाली, “मी तुझ्याइतकी…”
अयान मुखर्जीच्या अस्त्रवर्समधील दुसरा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र पार्ट २: देव’ २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. काही महिन्यामध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. या चित्रपटामध्ये ‘अमृता’ हे महत्त्वपूर्ण पात्र अभिनेत्री दीपिका पदुकोण साकारणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय ‘देव’ हे पात्र कोण साकारणार आहे या प्रश्नावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.