‘बिग बॉस हिंदी’चं सोळावं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरलेला शिव ठाकरे हिंदीमध्येही प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. ‘बिग बॉस हिंदी’च्या येणाऱ्या भागात फॅमिली वीक सेलिब्रेट करण्यात येणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कुटुंबियांपासून दूर असलेल्या सदस्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरातील खास पाहुणे येणार आहेत.
‘बिग बॉस १६’ मधील चर्चेतील चेहऱ्यांपैकी साजिद खान एक आहे. साजिदला भेटायला त्याची बहीण फराह खान येणार आहे. कलर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. फराहने घरात प्रवेश करताच साजिदला घट्ट मिठी मारली. फराहला पाहून साजिद भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. ‘बिग बॉस १६’च्या एका भागात साजिद खानने त्याच्या आणि फराह खानच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या होत्या.
फराह आणि साजिदचे वडील चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक होते. साजिदने त्यांच्या शेवटच्या दिवसातील काही घटना सांगितल्या. साजिदच्या म्हणण्यानुसार एक चित्रपट आपटल्यानंतर त्यांच्या वडिलांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. त्यांनी त्यांच्याकडचे सगळे पैसे त्यात टाकले होते. नुकसान झाल्यानंतर त्यांना दारूचं व्यसन लागलं आणि त्यांची तब्येत ढासळू लागली. जेव्हा त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्यांचे अंतिम संस्कार करण्यासाठीही त्यांच्या घरच्यांकडे पैसे नव्हते.
आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : चाहत्यांची अजबच मागणी; आता हिंदी बिग बॉसमध्येही अक्षय केळकरची एंट्री?
शेवटी सलमान खानचे वडील सलीम खान यांनी फराह आणि साजिदला मदत केली तेव्हा कुठे ते त्यांच्या वडिलांचे अंतिम संस्कार करू शकले. इतकंच नव्हे तर ‘इंडियन आयडल १३’च्या एका भागात फराहनेसुद्धा त्यांच्या वडिलांबद्दल भाष्य केलं होतं. तिच्या म्हणण्यानुसार जेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा त्यांच्याकडे केवळ ३० रुपये होते. त्यामुळे जेव्हा कुणी त्यांना भाग्यशाली म्हणतं तेव्हा फराहला त्याची चीड येते. कारण त्यांनी हे आयुष्य केवळ आणि केवळ प्रचंड मेहनतीवर मिळवलं आहे असं तिचं म्हणणं आहे. फराहने ‘मै हूं ना’, ‘ओम शांती ओम’, ‘हॅप्पी न्यू इयर’सारखे सुपरहीट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत, शिवाय ती बॉलिवूडमधील एक उत्तम कोरिओग्राफर आहे.