फराह खान बॉलीवूडमधील कोरिओग्राफी क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. फराहनं बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांच्या गाण्यांसाठी कोरिओग्राफी केली आहे. पुढे तिनं सिनेसृष्टीत दिग्दर्शन क्षेत्रातही आपलं पाऊल ठेवलं. ‘कुछ कुछ होता है’, ‘ओम शांती ओम’ असे तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले. फराह खान कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अशात आता नुकतंच तिनं तिच्या पतीबद्दल एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फराह खाननं नुकतीच अर्चना पूरन सिंगच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी मुलाखतीमध्ये तिनं सुरुवातीचे सहा महिने ती शिरीष कुंदरचा द्वेष करत होती, असं सांगितलं आहे. फराह खाननं २००४ मध्ये शिरीष कुंदरबरोबर विवाह केला. शिरीष तिच्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे. मुलाखतीमध्ये अर्चनानं फराहला दोघांचे रोमँटिक नाते आणि लव्ह स्टोरी याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना फराह खान म्हणाली, “सुरुवातीला मी त्याचा द्वेष करीत होते. पहिल्याच भेटीत तो मला समलैंगिक आहे, असं वाटलं होतं,” फराह खाननं पतीबद्दल केलेलं हे वक्तव्य आता चर्चेत आलं आहे.

अर्चनानं तिला पुढे तिला विचारलं की, तू आताही शिरीषचा द्वेष करतेस का? त्यावर उत्तर देताना फराह म्हणाली, “नाही, आता मला त्याची सवय झाली आहे. आता आमच्या नात्याला २० वर्षं झाली आहेत. सुरुवातीला त्याला पटकन राग यायचा. त्याला राग आला की, तो अगदी शांत व्हायचा. अबोला ठेवायचा आणि त्यामुळे मला फार त्रास व्हायचा.”

फराह खान आणि शिरीष कुंदर या दोघांनी एकत्र काही चित्रपटांसाठी काम केलं आहे. शाहरुख खान अभिनीत बॉक्स ऑफिसवर तुफान गाजलेला ‘मै हूँ ना’ हा या दोघांनी एकत्र काम केलेला पहिलाच चित्रपट होता. त्यानंतर फराह आणि शिरीष यांनी ‘जान ए मन’, ‘ओम शांती ओम’, ‘तिस मार खान’ अशा काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

फराह खानच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तिला आधीपासूनच डान्सची फार आवड होती. ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटापासून तिनं कोरिओग्राफीला सुरुवात केली. पुढे तिनं ‘अंगार’, ‘कभी हां कभी ना’, ‘वक्त हमारा है’, ‘पहला नशा’, ‘ओम शांती ओम’, ‘वेलकम’, ‘माय नेम इज खान’, ‘हाउसफुल २’, ‘दिल बेचारा’ या आणि अशा अनेक चित्रपटांतील गाण्यांसाठी कोरिओग्राफी गेली आहे.

गेल्या काही वर्षांत फराहने ‘इंडियन आयडॉल’, ‘डान्स इंडिया डान्स’, ‘फियर फैक्टर : खतरों के खिलाडी’ अशा काही टीव्ही शोमध्ये परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. सध्या फराह ‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’ होस्ट करीत आहे.