दिग्गज अभिनेत्री झीनत अमान यांनी नुकताच दिवंगत अभिनेते फिरोज खान यांच्याबरोबर काम केल्याच्या आठवणींना उजाळा दिला. सेटवर पोहोचायला उशीर झाल्यामुळे एकदा फिरोज खान यांनी त्यांचे पैसे कापले होते, असं त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या दाव्यावर फिरोज यांचा मुलगा फरदीन खानने प्रतिक्रिया दिली आहे.
फरदीनने झीनत अमान यांची पोस्ट स्टोरीवर शेअर केली आणि त्यांना टॅग केलं. “आंटी ही जर सांत्वना असेल तर आमचं कुटुंबही यातून सुटलं नव्हतं. आम्हाला फक्त २५% स्टँडर्ड फॅमिली डिस्काउंट मिळाले होते. खान साब यांना तुमची पोस्ट नक्कीच आवडली असती, ते खूप हसले असते”, असं फरदीनने म्हटलं आहे.

झीनत अमान यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
इन्स्टाग्रामवर स्वतःचा फिरोज खान यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर करत झीनत यांनी लिहिलं होतं, “मी कुठेतरी वाचलं आहे की २०२३ सालासाठी ऑक्सफर्ड शब्द ‘रिझ’ आहे. अर्थात ‘करिश्मा’चं संक्षिप्त रुप. बरं, जर मी कधी एखाद्याला रिझचा त्रास झालेला पाहिला असेल तर ते फिरोज खान होते. फिरोज आणि माझी सुरुवात चांगली झाली नाही. ते ७० चे दशक होते, माझं करिअर शिखरावर होतं आणि त्यांनी मला त्यांच्या आगामी चित्रपटामध्ये भूमिका देण्यासाठी फोन केला होता. हा मी त्या चित्रपटासाठी नकार दिला आणि फिरोज यांना राग आला, मग त्यांनी शिवीगाळ केली आणि मी रिसीव्हर कानापासून दूर नेला.”
झीनत यांनी पुढे लिहिलं, “अनेक महिन्यांनंतर त्यांनी पुन्हा फोन केला. यावेळी त्यांनी ‘ही मुख्य भूमिका आहे म्हणून नाकारू नका’ असं म्हणत बोलायला सुरुवात केली. मी होकार दिला आणि ‘कुर्बानी’च्या टीममध्ये सामील झाले. मी खूप मेहनती होते. पण कदाचित तरुणपणाचा प्रभाव असेल एकदा मी एका पार्टीला जायला तयार झाले. त्या रात्री मी खूप नाचले, दारू प्यायले होते आणि दुसऱ्या दिवशी मी सेटवर एक तास उशीरा पोहोचले.”
झीनत यांनी पुढे लिहिलं, “फिरोज कॅमेऱ्याच्या मागे होते आणि मी मला का उशीर झाला, याबद्दल काही कारण सांगण्याआधीच ते म्हणाले, ‘बेगम, तुम्ही उशीरा आला आहात, त्यामुळे तुम्हाला उशीरा आल्याची किंमत चुकवावी लागेल. कोणतंही कारण नाही किंवा मी ओरडतही नाही.’ मग त्यांनी त्या एका तासाच्या उशीरासाठी क्रूला पैसे देण्यासाठी माझा पगार कापला होता.”