अभिनेता फरदीन खान (Fardeen Khan)ने १४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ आणि ‘खेल खेल में’ या चित्रपटांत अभिनेता महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आला. आता मात्र एका मुलाखतीत स्वत:च्या मुलांविषयी त्याने केलेल्या वक्तव्यामुळे तो सध्या चर्चेत आहे.

अभिनेता अभिनय क्षेत्रात पुन्हा काम करण्यासाठी, करिअरसाठी लंडनहून मुंबईत परतला आहे; मात्र त्याचे कुटुंब लंडनमध्ये आहे. त्यामुळे तो त्याच्या पत्नी नताशा माधवानीपासून विभक्त झाला आहे, अशा चर्चा अनेकदा होताना दिसतात.

काय म्हणाला अभिनेता?

फरदीन खानने नुकतीच ‘टाइम्स ऑफ इंडियाला’ मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने म्हटले, “माझे कुटुंब माझ्यापासून दूर का आहे यावर मला चर्चा करायची नाही. मात्र, मला माझ्या मुलांची खूप आठवण येते. मी त्यांना चार ते सहा आठवड्यांतून भेटतो. दररोज व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात असतो. त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होणे आणि त्यांना मोठे होताना पाहणे, या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहे; पण आता त्या मी करू शकत नाही. मी माझ्या मुलांचे आर्ट वर्क मुंबईच्या घरातील भिंतीवर लावले आहे. मुलांना मिठी मारणे वगैरे या सगळ्या गोष्टींची मला आठवण येते. त्यांची सतत आठवण येऊ नये म्हणून मी माझे मन विचलित करण्याचा प्रयत्न करतो.”

फरदीन खानने दिग्गज अभिनेत्री मुमताज यांची मुलगी नताशा माधवानीबरोबर २००५ मध्ये लग्नगाठ बांधली होती. २०१३ मध्ये त्यांना मुलगी झाली आणि २०१७ मध्ये त्यांना मुलगा झाला होता.

हेही वाचा: Video: बहिणीला मुलगी झाली समजताच तितीक्षा तावडे झाली भावुक; भाचीचा पहिला फोटो पाहिल्यानंतर काय म्हणाली? जाणून घ्या…

फरदीन खानने १९९८ ला ‘प्रेम अगन’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. फिरोझ खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दुल्हा मिल गया’ या चित्रपटानंतर त्याने अभिनयातून ब्रेक घेतला होता. १४ वर्षांनंतर तो संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हीरामंडी या वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. त्याच्या या भूमिकेचे मोठे कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर फरदीन खान ‘खेल खेल में’ या चित्रपटात अक्षय कुमार, तापसी पन्नू यांच्याबरोबर तो मुख्य भूमिकेत दिसला. आता तो २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नो एन्ट्री’ चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये दिसणार आहे.