बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानचा ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. चित्रपटाने दमदार कमाई केली होती. २००६ साली प्रदर्शित झालेला शाहरुखचा ‘डॉन’ चित्रपटही चांगलाच गाजला होता. आत्तापर्यंत डॉनचे दोन भाग आले आहेत. प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहेत. अलीकडेच फरहान अख्तरच्या डॉन-३ मधून शाहरुखला वगळण्यात आले असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. या बातमीने शाहरूखच्या चाहत्यांची खूप निराशा केली होती. मात्र, आता डॉन-३ चित्रपटाशी संबंधित नवीन माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ‘डॉन-३’ चित्रपटात डॉनची भूमिका शाहरुख खान नव्हे तर रणवीर सिंग साकारणार आहे. निर्माते डॉन-३ साठी नवीन ‘ए-लिस्टर’ अभिनेत्याशी चर्चा करीत आहेत. आता या हिट फ्रँचायझीसाठी रणवीर सिंगच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. शाहरुख खानने चित्रपटांमधून काढता पाय घेतल्यानंतर निर्माते अशा अभिनेत्याच्या शोधात होते ज्याच्यावर लोक विश्वास ठेवू शकतील. त्यानंतर खूप विचार करून रणवीर सिंगचे नाव फायनल केले आहे. रणवीर सिंग पहिल्यांदाच ‘डॉन’सारख्या पात्रात दिसणार आहे.
‘डॉन-३’ च्या घोषणेसाठी निर्मात्यांनी रणवीर सिंगसोबत एक व्हिडीओ शूट केल्याचेही समजते. लवकरच ‘प्रॉडक्शन हाऊस’ रणवीरचा हा व्हिडीओ रिलीज करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, फरहान अख्तरने डॉन-३ मध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि जनरल-नेक्स्ट स्टार या तिन्ही पिढ्यांना एकत्र आणण्याची कल्पना सुचली होती. मात्र, शाहरुख खानला ही कल्पना फारशी रुचल्याचे दिसले नाही. त्यामुळे शाहरुख खानने स्वत: या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे.