फरहान अख्तरने शिबानी दांडेकरशी २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. यापूर्वी त्याने अधुना भाबानीबरोबर १६ वर्षं संसार केला होता. त्यांना दोन मुली आहेत. अधुना व फरहान यांचा घटस्फोट झाल्यानंतर मुली शाक्य आणि अकीरा यांच्या प्रतिक्रिया काय होत्या याबद्दल फरहानने एका मुलाखतीत सांगितलं आहे. आमच्या घटस्फोटाचा मुलींना भावनिक धक्का बसला आणि या घटनेमुळे त्यांचं अप्रत्यक्ष नुकसान झालं, असं फरहान म्हणाला.

रिया चक्रवर्तीला दिलेल्या मुलाखतीत फरहानने त्याला वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्याच्या व अधुनाच्या घटस्फोटाचा मुलींवर झालेल्या परिणामाबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, “आमचा घटस्फोट मुलींसाठी सोपा नक्कीच नव्हता. कारण त्यांना वाटत होतं की आमचं नातं स्थिर आणि परिपूर्ण होतं, पण त्या नात्याला तडा गेला होता हे सत्य होतं. त्यामुळे त्यांच्या मनात काही प्रमाणात राग असणं साहजिक आहे. आजही कदाचित त्यांच्या मनात नाराजी असू शकते. ही एक अशी गोष्ट आहे ज्याचं उत्तर संवाद साधल्याने मिळेल आणि त्यासाठी कदाचित बराच वेळही लागेल.”

हेही वाचा…घटस्फोटित बॉलीवूड अभिनेत्याशी आंतरधर्मीय लग्न केल्यावर मराठमोळी शिबानी झालेली ट्रोल; म्हणाली, “मला लव्ह जिहाद…”

फरहानने पुढे सांगितलं की अधुना आणि त्याचं नातं संपल्यानंतर त्याला आपल्या मुलींबद्दल खूप अपराधीपणाची भावना जाणवली. त्याने म्हटलं, “अधुना आणि माझ्या घटस्फोटाच्या वेळी मला मुलींप्रती खूप अपराधी वाटलं, कारण त्या दोघींचा याच्याशी काहीच संबंध नव्हता. त्यामुळे त्यांना आमच्या घटस्फोटामुळे भावनिक धक्का बसला.”

पूर्वी फेय डिसुझाला दिलेल्या मुलाखतीत फरहानने सांगितलं होतं की अधुनापासून विभक्त होण्याचा निर्णय घेत असताना त्याच्या मनात सतत स्वतःच्या पालकांच्या विभक्त होण्याच्या आठवणी येत होत्या. फरहानच्या आई-वडिलांचा, जावेद अख्तर आणि हनी इराणी यांचा तो लहान असताना घटस्फोट झाला होता. फरहान म्हणाला, “माझ्या मुलींशी मी आणि अधुनाने या निर्णयाबद्दल प्रामाणिकपणे आणि उघडपणे बोलणं महत्त्वाचं होतं. त्यांना हे समजावणं महत्त्वाचं होतं की या निर्णयाचं त्यांच्याशी काहीच संबंध नाही. हा निर्णय त्यांच्यामुळे घेतला जात नाही, त्यांचं काही चुकलं नाही.”

हेही वाचा…जिच्यामुळे मोडलं सलमान खान-संगीता बिजलानीचं लग्न, तिनेच सांगितलं ‘त्या’ दिवशी काय घडलं होतं?

अपराधीपणाची भावना कायम

फरहानने पुढे सांगितलं, “माझा घटस्फोट झाल्यानंतर माझ्या मुलींप्रती असणारी ही अपराधीपणाची भावना आयुष्यभर राहील. माझ्या मुलींबरोबर जे झालं ते योग्य होतं की नाही, हा विचार कधीही माझ्या मनातून जाणार नाही. तो वारंवार येत राहील.”