120 Bahadur Look Poster Released:अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरने कधी पडद्यामागे राहून तर कधी पडद्यावर येऊन अनेक उत्तम कलाकृती बॉलीवूडला दिल्या आहेत. त्यामध्ये ‘दिल चाहता है’, ‘लक्ष्य’, ‘डॉन’ या सिनेमात पडद्यामागे दिग्दर्शक म्हणून उभा राहून प्रेक्षकांना उत्तम आशय आणि मनोरंजन दिले. तर ‘रॉक ऑन’ सिनेमातून अभिनेता म्हणून पदार्पण करत, पुढे आलेल्या ‘भाग मिल्खा भाग’ मधून त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. स्टेजवर कधी गायक म्हणून, तर कधी निर्माता म्हणून अशा विविध भूमिकेत असलेला फरहान (Farhan Akhtar) गेल्या काही दिवसांपासून अभिनेता म्हणून पडद्यावर दिसला नव्हता. मात्र फरहान आता ‘१२० बहादूर’ या नव्या सिनेमात मेजर शैतान सिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत आणि चीन यांच्यादरम्यान १९६२ मध्ये झालेल्या प्रसिद्ध रेझांग लाच्या युद्धावर आधारित हा सिनेमा आहे. फरहानने याआधी ‘लक्ष्य’ हा कारगिल युद्धावर आधारित सिनेमा दिग्दर्शित केला होता. आता भारतीय सैनिकांवर आधारित ‘१२० बहादूर’ या सिनेमात फरहान सैनिकाची भूमिका साकारत आहे. फरहान अख्तरने ४ सप्टेंबरला त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून या सिनेमाची पहिली झलक असलेले पोस्टर शेअर केले. १८ नोव्हेंबर १९६२ रोजी रेझांग ला येथे भारत आणि चीनच्या सैन्यात लढाई झाली होती.

हेही वाचा…दारूची नशा, सिगारेटचे चटके अन्…; नर्गिसने सुनील दत्त यांच्याशी लग्न केल्यावर राज कपूर यांची ‘अशी’ झाली होती अवस्था

फरहानने या सिनेमाचे जे पोस्टर शेअर केले आहे, त्यात त्याची पाठ दिसत असून, त्याच्या हातात बंदूक आहे. त्याच्या समोर हिमालयातील बर्फाच्छादित पर्वत दिसत असून, तो एका पर्वतावर उभा आहे. आजूबाजूच्या पर्वतांवर हल्ल्याचे दृश्य दिसत आहे.

फरहानने हे पोस्टर शेअर करताना लिहिलं, “त्यांनी जे साध्य केले ते कधीही विसरता येणार नाही. परमवीर चक्र विजेते मेजर शैतान सिंग आणि १३ कुमाऊँ रेजिमेंटच्या चार्ली कंपनीच्या सैनिकांची कहाणी सादर करत आहे, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. १८ नोव्हेंबर १९६२ रोजी भारत-चीन दरम्यान लढलेली रेझांग लाची प्रसिद्ध लढाई आपल्या शूर सैनिकांच्या अतुलनीय शौर्याची, धैर्याची आणि निस्वार्थीपणाची कहाणी आहे. या अद्भुत कथेला पडद्यावर आणण्यासाठी भारतीय लष्कराचे संपूर्ण सहकार्य मिळाले, याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत.”

हेही वाचा…अजय देवगणनं मुंबईतले ऑफिस दिले भाड्याने; महिन्याला सात लाख रुपये उत्पन्न

फरहानच्या या पोस्टवर त्याची पत्नी शिबानी दांडेकरने लिहिले आहे, “मी हा सिनेमा पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. संपूर्ण टीमला शुभेच्छा.” अर्जुन रामपाल, झोया अख्तर आणि रणवीर सिंग यांनी सुद्धा फरहानला त्याच्या पोस्टवर कमेंट करून सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘१२० बहादूर’ या सिनेमाचे दिग्दर्शन रजनीश घई करणार असून, सिनेमाची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिधवाणी यांची एक्सेल एन्टरटेनमेंट निर्मिती संस्था करणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farhan akhtar to portray major shaitan singh in 120 bahadur based on the 1962 rezang la battle between india and china psg