Fawad Khan Bollywood Comeback : पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आठ वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहे. २०१६ साली आलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ (२०१६) या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. २०१६ पासून भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय तणावामुळे पाकिस्तानी कलाकारांना बॉलीवूडमध्ये काम करण्यावर अनौपचारिक बंदी घालण्यात आली होती. मध्यंतरी फवाद खानचा ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ (२०२२) हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण त्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे प्रदर्शन थांबवण्यात आलं. असं असूनही आता फवाद खान पुन्हा बॉलीवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे.
फवाद खान आणि अभिनेत्री वाणी कपूर एकत्रितपणे नव्या चित्रपटात काम करणार असून या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे. या सिनेमातूनच फवाद खान बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार आहे.
हेही वाचा…अरबाज खानला चाहत्याने विचारला तिसऱ्या लग्नाबद्दल प्रश्न, अभिनेता उत्तर देत म्हणाला…
लंडनमध्ये सुरू झाले शूटिंग
पाकिस्तानी अभिनेता फवाद खान (Fawad Khan) अखेर बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहे. वाणी कपूर आणि फवाद खान मुख्य भूमिकेत असलेल्या नव्या रोमँटिक चित्रपटाची घोषणा झाली आहे. या चित्रपटाचं नाव ‘अबीर गुलाल’ असं असून, सध्या या चित्रपटाचं शूटिंग लंडनमध्ये सुरू आहे.
रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचा पहिला लूक
सोमवारी (७ ऑक्टोबर २०२४) या सिनेमाची घोषणा करण्यात आली. याचबरोबर चित्रपटाचा पहिला लूकदेखील समोर आला. ‘व्हरायटी’च्या रिपोर्टनुसार, फवाद आणि वाणी यांनी लंडनच्या वेगवेगळ्या लोकेशन्सवर या चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं आहे. पहिल्या लूकमध्ये फवाद आणि वाणी हिरवळीवर एकमेकांच्या जवळ पहुडलेले दिसतात. फवाद आकाशाकडे पहात आहे, तर वाणीने त्याला प्रेमाने मिठी मारली आहे.
हेही वाचा…Singham Again : रामायणाशी खास कनेक्शन ते खलनायकाचा जबरदस्त अंदाज! ५ मिनिटांचा ट्रेलर पाहिलात का?
हा चित्रपट आरती एस. बगदी दिग्दर्शित करत आहेत, त्यांनी याआधी २०२४ च्या जुलै महिन्यात आलेल्या ‘चलती रहे जिंदगी’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘अबीर गुलाल’ चित्रपटाची निर्मिती इंडियन स्टोरीज, ‘अ रिचर लेन्स’ आणि ‘आरजे पिक्चर्स’ यांनी केली आहे. विवेक बी. अग्रवाल, अवंतिका हरी आणि राकेश सिप्पी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. संपूर्ण चित्रपट ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत यूकेमध्ये चित्रित होणार आहे.
फवाद-वाणीची केमिस्ट्री प्रेक्षकांना भुरळ घालणार
निर्मात्यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना एका निवेदनात सांगितलं, “फवाद खानचा जागतिक स्तरावर मोठा चाहता वर्ग आहे आणि आम्हाला खात्री आहे की, फवाद आणि वाणी यांची केमिस्ट्री स्क्रीनवर जादू निर्माण करेल. त्यांच्या मोहक अभिनयाने ते प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवतील.”
Fawad Khan and Vaani Kapoor are teaming up for a new romantic comedy, #AbirGulaal! Shooting begins in London?? Can't wait to see their chemistry on screen!@_fawadakhan_ @Vaanioffical @vivekbagarwal @avantikaH_A @AricherLens pic.twitter.com/v3hdOHcnta
— Ramesh Bala (@rameshlaus) October 7, 2024
आठ वर्षांनंतर फवादचं बॉलीवूडमध्ये पुनरागमन
या चित्रपटातून फवाद खानचं भारतीय मनोरंजन क्षेत्रात आठ वर्षांनंतर पुनरागमन होत आहे. तो शेवटचं करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ (२०१६) मध्ये दिसला होता. त्याने ‘खूबसूरत’ (२०१४) आणि ‘कपूर अँड सन्स’ (२०१६) सारख्या हिट चित्रपटांत मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
तर दुसरीकडे, वाणी कपूरने ‘चंदीगड करे आशिकी’ चित्रपटात एका ट्रान्सजेंडर व्यक्तिरेखेची भूमिका साकारून प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. ती लवकरच ‘मंडाला मर्डर्स’ या नेटफ्लिक्स क्राईम थ्रिलर सीरिजमध्ये दिसणार आहे.