बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन व अभिनेत्री दीपिका पदुकोण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आगामी ‘फायटर’ चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर व यामधील कलाकारांचे लूक निर्मात्यांकडून शेअर करण्यात आले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने हृतिक-दीपिका ही बॉलीवूडची फ्रेश जोडी सिनेप्रेमींना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून हा देशभक्तीपर चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘फायटर’ चित्रपटाच्या शूटिंगला २०२१ मध्ये सुरुवात झाली होती. याचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं असून यापूर्वी त्यांनी हृतिकच्या ‘वॉर’ चित्रपटाचं दिग्दर्शन देखील केलं होतं. नुकताच ‘फायटर’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये हृतिकने स्क्वॉड्रन लीडर ‘शमशेर पठानिया’ची भूमिका साकारली असून त्याला चित्रपटात सगळेजण पॅटी म्हणून संबोधतील.
हेही वाचा : Video: मराठमोळ्या सासूबाईंनी आयरा खानचं कुटुंबात ‘असं’ केलं स्वागत; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, “तू आमच्या…”
देशात २०१९ मध्ये झालेला पुलवामा हल्ला व त्यानंतर भारतीय हवाई दलाकडून करण्यात आलेला एअर स्ट्राइक याची झलक फायटर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. यामध्ये प्रेक्षकांना अनेक देशभक्तीवर संवाद ऐकायला मिळतात. ‘फायटर’मध्ये प्रमुख अधिकाऱ्याची भूमिका साकारणारे अनिल कपूर हवाई दलातील सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्यांची एक टीम तयार करतात. यामध्ये हृतिक, दीपिका आणि करण यांचा समावेश असतो. ट्रेलरमध्ये दुसरीकडे, हृतिक – दीपिका यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. परंतु, युद्ध सुरू झाल्यावर हे दोघेही प्रेमाचा त्याग करणार असे संकेत ट्रेलरमध्ये देण्यात आले आहेत.
हेही वाचा : “बाळ झाल्यावर काम मिळेल की नाही?” माधवी निमकरने गरोदरपणाबद्दल मांडलं मत; म्हणाली, “१५ किलो वजन…”
दरम्यान, ‘फायटर’मध्ये हृतिक-दीपिका व अभिनेते अनिल कपूर यांच्याशिवाय करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, संजीदा शेख, तलत अजीज या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा बहुचर्चित चित्रपट येत्या २५ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.