१६ जून रोजी प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ चित्रपट अवघ्या एका आठवड्यात बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला. पहिल्याच दिवशी चित्रपट नकारात्मक रिव्ह्यू आणि वादग्रस्त संवादामुळे वादात अडकला. नंतर संवादही बदलण्यात आले, पण त्याचा फायदा निर्मात्यांना झाला नाही. पहिल्या दिवशी जगभरात १४० कोटींचा व्यवसाय करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरुन कधी गायब झाला हे लोकांनाही समजलं नाही. सगळ्याच स्तरातून या चित्रपटाला प्रचंड विरोध झाला.
प्रसिद्ध समीक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनीही चित्रपट पाहून यावार जोरदार टीका केली. नुकतंच अर्धं वर्षं सरून गेल्याच्या निमित्ताने बॉलिवूडच्या गेल्या ६ महिन्यातील परिस्थितीवर तरण आदर्श यांनी भाष्य केलं आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तरण आदर्श यांनी २०२३ च्या पहिल्या सहा महिन्यांमधील बॉलिवूड चित्रपटांचा अभ्यास मांडून दाखवताना ‘आदिपुरुष’वर पुन्हा सडकून टीका केली.
आणखी वाचा : “मी वयाच्या १७ व्या वर्षी आईची भूमिका केली” राणी मुखर्जीच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी उडवली अभिनेत्रीची खिल्ली
‘पठाण’नंतर बॉलिवूड पुन्हा आयसीयुमध्ये गेलं असंही तरण आदर्श यांनी म्हंटलं आहे. ते म्हणाले, “पठाणनंतर ‘शेहजादा’, सेल्फी’, ‘किसी का भाई किसी की जान’, ‘भोला’ बरेच चित्रपट आले पण ते फारसे चालले नाहीत, आणि यानंतर आलेल्या ‘आदिपुरुष’ने तर हिंदी चित्रपटसृष्टीचं कंबरडंच मोडलं. ५०० कोटींचं बजेट आणि रामायणावर बेतलेल्या चित्रपटाला झालेला विरोध फार दुःखद होता.”
पुढे तरण आदर्श म्हणाले, “आदिपुरुष फक्त वाईट चित्रपट नव्हे तर तो प्रचंड वाईट चित्रपट होता. तो चित्रपट फ्लॉप होणं हे निश्चित होतं. अशाप्रकारचे चित्रपट फ्लॉप होणं आवश्यक आहे, कारण ‘आदिपुरुष’सारखे चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीचं नाव खराब करत आहे.” एकूणच या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात ‘आदिपुरुष’सारख्या चित्रपटामुळे हिंदी चित्रपटसृष्टीचं प्रचंड नुकसान झालं आहे असं तरण आदर्श यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे.