दिग्दर्शक करण जोहर सध्या त्याच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने करणने ७ वर्षांनी पुन्हा एकदा दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली आहे. चाहत्यांसह करण स्वत:ही या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहे. मात्र, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा टीझर व ट्रेलर रिलीज झाल्यावर नेटकऱ्यांनी करणला ट्रोल केले होते.
हेही वाचा : “भविष्यात नीना गुप्तांबरोबर पडद्यावर रोमान्स…”, सुप्रसिद्ध अभिनेत्याचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
अलीकडेच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असून अनेकांनी त्याला “जुन्या चित्रपटांची कॉपी केली” असे म्हणत ट्रोल केले आहे. ट्रेलर रिलीज झाल्यावर त्याने इन्स्टाग्रामवर लाइव्ह सेशन घेतले. या सेशनदरम्यान अनेकांनी करणला शिवीगाळ करत आक्षेपार्ह कमेंट केल्या.
हेही वाचा : इस्लाम धर्मासाठी बॉलीवूड सोडणाऱ्या सना खानने दिला बाळाला जन्म, म्हणाली “अल्लाहने आम्हाला…”
इन्स्टाग्राम लाइव्हवर करण सगळ्या कमेंट्स वाचत होता परंतु, जेव्हा त्याच्या कुटुंबाशी संबंधित प्रतिक्रिया आल्या तेव्हा त्याने सेशन मध्येच थांबवले आणि ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले. करण म्हणाला, “कोणत्याही कमेंट्स लिहिण्यापूर्वी जरा विचार करा, दुसऱ्याच्या कुटुंबाला बोलण्याआधी तुमच्याही घरी तुमचे कुटुंब आहे याचे तरी भान ठेवा. सोशल मीडियावर एकाच प्रकारच्या कमेंट्स करून मला वारंवार ट्रोल केले जाते. तुम्हाला घरदार नाहीये का? माझ्या वैयक्तिक आयुष्यावर, कुटुंबावर टीका करून तुम्हाला काय मिळतं? दरवेळी माझ्या कुटुंबाला का ट्रोल केले जाते यामागील कारण मला समजत नाही.”
अशाप्रकारे करणने इन्स्टाग्रामवर त्याच्या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत त्याची बाजू स्पष्ट केली. दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट २८ जुलैला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रणवीर सिंह ‘रॉकी रंधवा’ आणि आलिया भट्ट ‘राणी चॅटर्जी’ ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. त्यांच्याशिवाय चित्रपटात जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट प्रेम आणि कुटुंब यावर आधारित असल्याचे ट्रेलर पाहून लक्षात येते.