बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूनम पांडेचं सरव्हायकल कॅन्सरमुळे (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) निधन झाल्याची माहिती शुक्रवारी (२ फेब्रुवारी) तिच्या टीमकडून देण्यात आली होती. तिच्या मॅनेजरने यासंदर्भात सविस्तर इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. यानंतर अभिनेत्रीच्या निधनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती. त्यामुळे एकंदरीत पूनमच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढत चाललं होतं. अखेर या २४ तास सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर पूनम पांडे जिवंत असल्याचं समोर आलं.
पूनम पांडेने स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. “मी जिवंत आहे, कर्करोगामुळे माझा मृत्यू झालेला नाही” असं तिने या व्हिडीओद्वारे स्पष्ट केलं आहे. याशिवाय यामध्ये तिने सर्वांची माफी मागितली आहे. सरव्हायकल कॅन्सर या गंभीर आजाराबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी पूनम आणि तिच्या पीआर टीमने हे पाऊल उचललं होतं हे तिने तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून स्पष्ट केलं. तरुण मुलींनी या आजारावरची लस घ्यावी अन् त्याविषयी लोकांमध्ये चर्चा व्हावी यासाठी पूनमने स्वतःच्या मृत्यूचं हे नाटक रचल्याचं कबूल केलं.
आणखी वाचा : “जेव्हा शाहरुख सिगारेट काढायचा…” पाकिस्तानी अभिनेत्याने सांगितला ‘ओम शांती ओम’च्या सेटवरील ‘तो’ किस्सा
तिच्या या उत्तरानंतर सोशल मीडियावर तिला लोकांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. इतक्या खालच्या थराला जाऊन केवळ पब्लिसिटीसाठी असा स्टंट करणाऱ्या पूनमला अटक करायला हवी अशी मागणी काहींनी केली आहे. तर काहींनी पूनमची सोशल मीडियावर चांगलीच कानउघडणी केली आहे. आता ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसीएशन’नेही पूनमच्या या कृतीवर टीका करत एक निवेदन जाहीर केलं आहे. या निवेदनात पूनमवर कायदेशीर कारवाई होऊन तिच्यावर गुन्हा दाखल करायला हवा अशी मागणी असोसीएशनने केली आहे.
निवेदनात लिहिण्यात आलं आहे की, “मॉडेल व अभिनेत्री हिचा हा फेक पीआर स्टंट ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. सरव्हायकल कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा प्रमोशनसाठी वापर करणं हा अक्षम्य गुन्हा आहे. या बातमीनंतर इंडस्ट्रीतील कोणाच्याही मृत्यूच्या बातमीवर लोकांचा विश्वास बसणार नाही किंवा ते विश्वास ठेवायला कचरतील. आजवर चित्रपटसृष्टीतील कुणीच प्रमोशनसाठी इतक्या खालच्या थराला उतरलेलं नाही.”
“अशा रीतीने स्वतःच्याच मृत्यूचे भांडवल करणाऱ्या अशा पीआर एजन्सिविरोधात आणि पूनम पांडे विरोधात एफआयआर दाखल करायला हवी. साऱ्या चित्रपटसृष्टीने व साऱ्या जनतेने ही बातमी ऐकल्यावर पूनमला श्रद्धांजली वाहिली. पूनमच्या मॅनेजरने तिच्या मृत्यूच्या बातमीची पुष्टीदेखील केली होती. त्यामुळे पूनमबरोबरच तिच्या मॅनेजरविरोधातही गुन्हा दाखल करायला हवा.” केवळ सिने वर्कर्स असोसीएशनच नव्हे तर देशातील प्रत्येक सामान्य नागरिक, नेटकरी सध्या पूनमवर कारवाई व्हावी अशीच मागणी करत आहेत. स्वतःच्या आर्थिक लाभासाठी अशा रीतीने लोकांच्या भावनांचा अपमान करणाऱ्या पूनमविरोधात सध्या सोशल मीडियावर जोरदार टीका होताना दिसत आहे.