भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक हे दादासाहेब फाळके यांनी सर्वप्रथम ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला चित्रपट लोकांसमोर सादर केला ज्यात कोणताही संवाद नव्हता. आज मात्र आपण पहिल्या भारतीय बोलपटाबद्दल जाणून घेणार आहोत. १४ मार्च १९३१ रोजी मुंबईच्या गिरगाव परिसरातील मॅजेस्टिक चित्रपटगृहात भारताचा सर्वात पहिला बोलपट प्रदर्शित झाला तो म्हणजे ‘आलम आरा’. या चित्रपटाला आज ९३ वर्षं पूर्ण होत आहेत त्यानिमित्त आज आपण याविषयी अधिक विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

१९२७ साली ‘द जॅझ सिंगर’ नावाचा जगातला पहिला बोलपट प्रदर्शित झाला अन् साऱ्या जगभरात याचा बोलबाला झाला. त्यानंतर काहीच वर्षांनी १९३० साली निर्माता आणि दिग्दर्शक अर्देशीर इराणी यांनी युनिव्हर्सल पिक्चर्स निर्मिती ‘शो बोट’ हा चित्रपट पाहिला अन् त्यांना या गोष्टीची जाणीव झाली की आता भारतातही हे तंत्रज्ञान यावं आणि आपणही आपला चित्रपट सादर करावा. १९८० मध्ये बीडी गार्गा यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये अर्देशीर इराणी यांनी बोलपट करण्यात येणाऱ्या अडचणींविषयी भाष्य केलं. इराणी यांनी सांगितल्याप्रमाणे तेव्हा कोणतीही साऊंडप्रूफ टेक्नॉलॉजी उपलब्ध नसल्याने तेव्हा शूटिंग हे एका बंद खोलीत रात्रीच्या वेळी पार पडायचे जेणेकडून कमीत कमी आवाजाचा त्रास होईल. पण तेव्हा बोलपट बनवण्याची प्रक्रिया ही अत्यंत एका मोठ्या गुपितासारखी लपवून ठेवण्यात आली होती अन् अशातच अर्देशीर इराणी यांनी ‘आलम आरा’ हा पहिला बोलपट बनवायचे शिवधनुष्य उचलले.

आणखी वाचा : इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; एकता कपूरच्या ‘या’ चित्रपटात झळकणार अभिनेत्री

त्यावेळी हा बोलपट करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तर समोर होत्याच पण तेव्हा चित्रपटात नेमकं कोणत्या कलाकारांना घ्यावं अशा कास्टिंगशी संबंधित अडचणीदेखील त्यांच्यासमोर होत्या. या समस्या नंतर इतक्या वाढल्या की एक वेळ अशी आली की मुस्लिम लीगचे नेते अन् नंतर झालेल्या पाकिस्तानचे कायदे आजम मोहम्मद अली जिना यांनादेखील यात हस्तक्षेप करावा लागला होता. त्याकाळी मोहम्मद अली जिना हे मुंबईतील एक प्रसिद्ध वकील होते अन् ब्रिटीशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख नेतृत्त्व म्हणूनही त्यांच्याकडे आदराने पाहिलं जात होतं. त्यावेळी ‘आलम आरा’ या चित्रपटात काम करण्यासाठी मुकपटात काम केलेले बरेच कलाकार उत्सुक होते. त्यापैकीच एक कलाकार होते ते म्हणजे मास्टर विठ्ठल.

‘स्क्रोल’मधील एका लेखाच्या माहितीनुसार, मास्टर विठ्ठल हे नाव तेव्हा चांगलंच चर्चेत होतं तसेच त्यांनी एका बोलपटासाठी शारदा स्टुडिओ या कंपनीबरोबर करारही केला होता. मास्टर विठ्ठल हे तेव्हा हा करार रद्द करून बोलपटात काम सुरू करण्यासाठी फार उत्सुक होते अन् अर्देशीर इराणी यांनादेखील विठ्ठल यांच्यासारखा लोकप्रिय चेहेरा आपल्या चित्रपटासाठी हवा होता. जेव्हा अर्देशीर इराणी यांनी ‘आलम आरा’साठी मास्टर विठ्ठल यांच्याबरोबर करार केला तेव्हा शारदा स्टुडिओने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली. हे प्रकरण कोर्टात जाणार हे जेव्हा ध्यानात आलं तेव्हा मास्टर विठ्ठल यांनी तेव्हाचे प्रसिद्ध वकील मोहम्मद अली जिना यांना संपर्क केला. जिना यांनी त्यावेळी हा खटला जिंकला अन् मास्टर विठ्ठल यांना ‘आलम आरा’मधील भूमिका साकारायची संधी मिळाली.

alam-ara
फोटो सौजन्य : एक्सप्रेस आरकाइव्ह

खुद्द जिना यांना कलक्षेत्रात प्रचंड रुचि होती. इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर जिना यांनी शेक्सपीयर कंपनीच्या माध्यमातून नाट्यक्षेत्रात करिअर करण्याचा प्रयत्न केला असल्याचंही म्हंटलं जातं. पण जेव्हा आपल्या वडिलांचं नाराजीचं पत्र जिनांच्या हातात पडलं तेव्हा मात्र त्यांनी यातून माघार घ्यायचा निर्णय घेतला. जिना यांचं अभिनयाचं स्वप्न अपूर्णच राहिलं पण भारताचा पहिला बोलपट बनवण्यात जिना यांचाही खारीचा वाटा आहे.

‘आलम आरा’ हा चित्रपट त्यावेळी फक्त ४० हजार रुपयांत बनवण्यात आला होता. मास्टर विठ्ठल, जुबैदा धनराजगीर, जिल्लो, सुशीला, पृथ्वीराज या कलाकारांनी या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटाची एकही प्रिंट उरलेली नसल्याने आज कोणालाही हा चित्रपट पाहता येणं अशक्य आहे, त्यामुळेच याला ‘लॉस्ट मुव्हीज’च्या पठडीत गणलं जातं.

Story img Loader