१२ ऑक्टोबर २०१८ साली भारतीय चित्रपटसृष्टीचे मापदंड मोडीत काढणारा ‘तुंबाड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, आणि केवळ माउथ पब्लिसिटीच्या आधाराने या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. आज या चित्रपटाला पाच वर्षं पूर्ण होत आहेत. सुरुवातीला या चित्रपटाकडे कुणी गांभीर्याने बघत नव्हतं, पण हा चित्रपट बघून जसजसे लोकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली तसा हा चित्रपट मोठा होत गेला.
दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा हा चित्रपट २०१५ सालीच तयार झाला होता, पण त्यातले स्पेशल इफेक्ट आणि इतर नवीन बदल करण्यासाठी त्यांना पुढची ३ वर्षं लागली. याचसंदर्भात राही अनिल बर्वे यांनी एक सोशल मीडिया पोस्ट लिहिली आहे. राही आता ‘तुंबाड’नंतर त्यांच्या ‘गुलकंद’ या वेब सीरिजवर काम करत आहेत. याबरोबरच ‘पहाडपांगिरा’ हा त्यांचा चित्रपटही चर्चेत आहे.
आणखी वाचा : Photos : केवळ ५ कोटींचे बजेट असलेला ‘तुंबाड’ कसा घडला?
राही बर्वे हे एखादी कलाकृती सादर करताना बराच वेळ घेतात, बरीच वर्षं त्यासाठी खर्ची करतात असा सवाल बऱ्याचदा त्यांना केला जातो. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राही यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. आपल्या पोस्टमध्ये राही लिहितात, “तुंबाड येऊन ५ वर्षं झाली, गेली साडेचार वर्षं ‘गुलकंद’वर काम सुरू आहे तर दीडवर्षं ‘पहाडपांगिरा’वर काम सुरू आहे. १७ वर्षांपूर्वी जेव्हा मी माझी पहिली शॉर्ट फिल्म ‘मांजा’ केली त्यालासुद्धा ३ वर्षं लागली होती. एवढा वेळ का लागतो? हा प्रश्न सतत विचारला जातो.”
पुढे याचं उत्तर देताना राही लिहितात, “अगदी प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं झालं तर, माझ्याकडे तेव्हासुद्धा वेळ होता कदाचित आत्ता जेवढा वेळ आहे त्याहून अधिक वेळ होता, पण त्यावेळी कोणाला कसलीच परवा नव्हती, किमान आत्ता तरी काही लोकांना मी जे काही करतोय त्याबद्दल काहीतरी वाटतं हीदेखील चांगलीच गोष्ट आहे, आणि त्यासाठी मी आभार मानतो. पण तरी काही लोक विचारतात की पाच ते दहा वर्षं का? यासाठी माझ्याकडे उत्तर नाही. आपण जे काम करतो आहोत ते प्रथमदर्शनी आपल्यालाच आवडलं नाही तर ते इतरांनाही निश्चितच आवडणार नाही.”
भारतीय चित्रपटाच्या इतिहासात काहीतरी वेगळी कलाकृती सादर करून ती यशस्वी करून दाखवणाऱ्या ‘तुंबाड’च्या पुढील भागाची आजही प्रेक्षक वाट पाहत आहेत. त्या वाड्याचे दार पुन्हा उघडेल अशी लोकांना आशा आहे. सध्या मात्र राही हे त्यांच्या ‘गुलकंद’ या वेबसीरिजवर काम करत आहेत.