नॅशनल क्रश रश्मिका मंदाना गेल्या काही महिन्यांपासून ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये तिने गीतांजली ही भूमिका साकारली होती. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ चित्रपटातील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. रश्मिकाने २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुडबाय’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याआधी तिने तेलुगू, तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. दक्षिणेतील लेडी सुपरस्टार म्हणून रश्मिकाला ओळखलं जातं. या अभिनेत्रीने दक्षिणेप्रमाणे अवघ्या दोन वर्षांत बॉलीवूडमध्ये देखील आपला जम बसवला आहे.
२०२२ मध्ये पदार्पण करून अवघ्या दोन वर्षांत रश्मिकाने वैयक्तिक आयुष्यात उंच भरारी घेतली आहे. ‘फोर्ब्स इंडिया ३० अंडर ३०’ ही यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या ३० वर्षांखालील ३० प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. यंदा यामध्ये चित्रपट व मनोरंजन क्षेत्रातील तीन अभिनेत्रींनी स्थान मिळवलं आहे.
वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी रश्मिकाला या यादीत स्थान मिळालं आहे. गेल्यावर्षी तिचे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. पहिला चित्रपट ‘वारीसू’ हा अॅक्शनपट होता. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींची कमाई केली होती. याशिवाय ती सिद्धार्थ मल्होत्रासह ‘मिशन मजनू’मध्ये झळकली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. यानंतर वर्षाखेरीस प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’मुळे रश्मिकाला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात ९०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. तसेच येत्या काळात अभिनेत्री ‘पुष्पा २: द रुल’, ‘रेनबो’, ‘द गर्लफ्रेंड’ आणि ‘छावा’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत तिने ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.
दरम्यान, रश्मिकाशिवाय या यादीत आणखी दोन अभिनेत्रींची वर्णी लागली आहे. २८ वर्षीय अभिनेत्री राधिका मदान आणि २५ वर्षीय अदिती सेहगल या दोघींना देखील ‘फोर्ब्स इंडिया ३० अंडर ३०’च्या यादीत स्थान मिळालं आहे. राधिका शेवटची ‘सजिनी शिंदे का वायरल व्हिडीओ’ मध्ये झळकली होती, तर अदितीने झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती.