‘गदर २’ हा चित्रपट यावर्षीच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. २ दशकापूर्वीच्या सुपरहिट ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. ‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. गेले अनेक दिवस या चित्रपटाची टीम या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
सध्या चित्रपटातील कलाकार याचं जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. सनी देओलसुद्धा या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान सनी देओलने बॉलिवूडमधील एकूण कारभाराबद्दल तसेच कंपूशाहीबद्दल भाष्य केले. सनी देओल कोणत्याही कॅम्पचा भाग नसल्याने त्याने यावर स्पष्टपणे त्याची मतं मांडली.
आणखी वाचा : अमिताभ बच्चन यांच्या शिफारसीमुळे ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला लहानपणी मुंबईतील शाळेत मिळालेला प्रवेश
‘दी लल्लनटॉप’च्या वृत्तानुसार सनी देओल म्हणाला, “इथे सगळेच तुमच्याशी तोंडावर फार प्रेमाने वागतात, पण हा सगळा दिखावा आहे हे मलाही ठाऊक आहे. बरेच लोक मला पाजी म्हणून हाक मारतात. मी बऱ्याच लोकांना विनंती करतो की मला पाजी हाक मारू नका कारण बऱ्याच लोकांना त्याचा खरा अर्थही माहीत नाही. पाजी म्हणजे मोठ्या व्यक्तीला आदराने हाक मारणे, पण बऱ्याच लोकांना याचा अर्थ ठाऊक नाही. ही मंडळी खऱ्या आयुष्यात उत्तम अभिनय करतात पण स्क्रीनवर ते अभिनय करू शकत नाहीत.”
याबरोबरच चित्रपटसृष्टीत कशाप्रकारे कंपूशाही चालते आणि मेहनत करणाऱ्या व्यक्तीला कसं बाजूला केलं जातं याबद्दलही सनी देओलने या मुलाखतीदरम्यान भाष्य केलं. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. ११ ऑगस्ट रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे, तर याबरोबरच अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड २’सुद्धा प्रदर्शित होणार आहे.