‘गदर २’ हा चित्रपट यावर्षीच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. २ दशकापूर्वीच्या सुपरहिट ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. ‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाबद्दल अनेक अपडेट्स समोर येत होते. याचबरोबर या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झाले होते. या सगळ्यामुळे या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढली होती.
ही उत्सुकता पाहता ‘गदर – एक प्रेम कथा’ हा पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. त्यालाही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. शिवाय याबरोबरच ‘गदर २’चा टीझरही दाखवण्यात आला जो प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केली आहे. अनिल शर्मा हे सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतंच त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सलमान खानबद्दलचे बरेच गैरसमज दूर केले आहेत.
आणखी वाचा : ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वशिष्ठने गुपचूप केलं लग्न; इस्लाम धर्म स्वीकारत बांधली लग्नगाठ
सलमान दारुड्या आहे शिवाय तो खूप मुजोर आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं अनिल शर्मा यांनी या मुलाखतीदरम्यान खोडून काढलं आहे. २०१० मध्ये आलेल्या ‘वीर’ या चित्रपटासाठी अनिल शर्मा आणि सलमान खान यांनी काम केलं होतं. त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव आणि त्याच्याबद्दल पसरलेले गैरसमज अनिल शर्मा यांनी दूर केले आहेत.
‘ई-टाइम्स’शी संवाद साधताना अनिल शर्मा म्हणाले, “सलमान खानबरोबर काम करताना फार मजा आली. लोक म्हणतात की तो दारुड्या आहे, मजोरडा किंवा मुजोर आहे, तो फक्त पार्ट्या करतो हे सगळं धादांत खोटं आहे. तोसुद्धा तुमच्या आमच्यासारखा संध्याकाळी निवांत एक दोन ड्रिंक्स घेतो, पण त्याचं पूर्ण लक्ष कामाकडे असतं. त्याने कोणाबद्दल वाईट उद्गार काढले नाहीत. शिवाय चित्रपट, गाणी याबद्दल त्याच्याकडे प्रचंड माहिती आहे. सलमान हा जणू चित्रपटांचा गुगलच आहे.”